अंनिस वार्तापत्राचे संपादक प. रा. आर्डे यांचे सांगलीत निधन
By संतोष भिसे | Published: October 14, 2022 12:55 PM2022-10-14T12:55:47+5:302022-10-14T12:56:16+5:30
अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत धडाडीने काम करणाऱ्या प्रा. आर्डे यांच्या निधनाने चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि अंनिस वार्तापत्राचे संपादक प्रा. परशराम राऊ तथा प. रा. आर्डे (वय ८१) यांचे आज, शुक्रवारी (दि. १४) पहाटे सांगलीत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी उषाताई, मुलगा विनय, मुलगी रुपाली यांच्यासह सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. आर्डे यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले.
अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत धडाडीने काम करणाऱ्या प्रा. आर्डे यांच्या निधनाने चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक म्हणून १९ वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. फसव्या विज्ञानाचे अभ्यासक, लेखक, वक्ते, हसत खेळत विज्ञान सांगणारे कार्यकर्ते अशा अनेकविध भूमिकांत अखेरपर्यंत कार्यरत राहिले.
प्रा. आर्डे यांचे मूळ गाव चोपडी (ता. पाटण, जि. सातारा) होते. १९६८ पासून रयत शिक्षण संस्थेत भौतिक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. १९८५ पासून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी वाहून घेतले. बुवाबाजीविरोधात संघर्ष, वैज्ञानिक जाणिवा शिबिरे, शाळा, महाविद्यालयांतून अंधश्रद्धा निर्मूलनावर व्याख्याने, लेखन याद्वारे अविरत कार्यरत राहिले. वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर 'हसत-खेळत विज्ञान' या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन केले होते. सन १९९५ पासून अंनिस वार्तापत्रात सहसंपादक, तर सन २००२ पासून प्रमुख संपादकपदाचा कार्यभार सांभाळला होता.
प्रा. आर्डे यांनी विविध पुस्तकांचे लिखाणही केले. अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे, विज्ञान व अंधश्रद्धा, आत्मा-पुनर्जन्म : प्लँचेट, वेध विश्वाचा व मानवी शौर्याचा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
अनेक पुरस्कारांनी गौरव
त्यांना डॉ. अरूण लिमये पुरस्कार, राज्य शासनाचा उत्तम साहित्य पुरस्कार, कराड येथील पी. डी. पाटील गौरव पुरस्कार, सांगलीतील मराठा समाजातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले होते. महाराष्ट्र अंनिसने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.