शिक्षण कमी झाले म्हणून, स्वत:ला कमी लेखू नका : धनंजय दातार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:33 PM2018-05-24T23:33:38+5:302018-05-24T23:33:38+5:30
अभ्यासात मी कच्चा होतो. दहावीत गणित विषयात पाचवेळा नापास झालो. सहाव्यांदा मात्र रात्रंदिवस अभ्यास करून पास झालो. आज उद्योगात डॉक्टरेट मिळविली. शिक्षण कमी झाले म्हणून स्वत:ला कमी लेखू नका.
सांगली : अभ्यासात मी कच्चा होतो. दहावीत गणित विषयात पाचवेळा नापास झालो. सहाव्यांदा मात्र रात्रंदिवस अभ्यास करून पास झालो. आज उद्योगात डॉक्टरेट मिळविली. शिक्षण कमी झाले म्हणून स्वत:ला कमी लेखू नका. सर्वसाधारण माणूसही उद्योगात यशस्वी ठरू शकतो, असे प्रतिपादन दुबईतील अल्-अदिल कंपनीचे संचालक तथा ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी गुरुवारी केले.
सांगलीत रोटरी क्लबच्यावतीने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी वंदना दातार, रोटरीचे अध्यक्ष सुभाष कुंटे, अजय शहा, भास्कर ताम्हणकर, उदय पाटील उपस्थित होते. श्वेता गानू यांनी डॉ. दातार यांची मुलाखत घेतली.
दातार म्हणाले की, अकोल्यात आजीकडे माझे शिक्षण झाले. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने अनेक अडचणी आल्या. पायात चप्पल नाही, शाळेसाठी एकच गणवेश होता. पावसाळ्यात गोणपाट अंगावर घेऊन शाळेत जात होतो. अभ्यासात मी कच्चा होतो. कुणी टक्केवारी विचारली, तर आजही मी ‘पास झालो’ इतकेच सांगतो. वडील दुबईत कामासाठी गेले होते. त्यांना मदत करण्यासाठी मीही दुबईत गेलो. एका छोट्या किराणा मालाच्या दुकानापासून उद्योगाची सुरूवात केली.
सुरुवातीला मोठे नुकसान झाले. पैसे बुडाले. आईचे दागिने विकून पुन्हा व्यवसाय सुरू केला. १६ तास काम केले. अखेर व्यवसायात यश मिळत गेले. त्यातून ‘अल्-अदिल ट्रेडिंग कंपनी’मार्फत संपूर्ण अरब अमिरातीमध्ये व्यापार पसरला आहे. याशिवाय तुळजा एक्स्पोर्ट इंडियामार्फत पिकॉक ब्रँड या नावाखाली मसाल्याची उत्पादनेही जगभरात जातात, असे त्यांनी सांगितले.
रोटरीतर्फे डॉ. दातार यांना मानपत्र देऊन सत्कार केला. अध्यक्ष सुभाष कुंटे यांनी स्वागत केले, तर मानपत्राचे वाचन अजय शहा यांनी केले.
माझ्यासाठी सांगली ‘लकी’
सांगलीतच वंदना देशपांडे या मुलीशी माझा विवाह झाला. विवाहावेळी दुबईत छोटे दुकान होते. आज यशस्वी उद्योजक होण्यात पत्नीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सांगली माझ्यासाठी ‘लकी’ ठरली आहे, असे दातार म्हणाले.