माणूस समृद्ध होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:29 AM2021-03-01T04:29:29+5:302021-03-01T04:29:29+5:30
मराठी अध्यापक संघातर्फे गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांना सेवाव्रती पुरस्कार कवी प्रदीप पाटील यांच्या हस्ते ...
मराठी अध्यापक संघातर्फे गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांना सेवाव्रती पुरस्कार कवी प्रदीप पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी विठ्ठल मोहिते, डॉ. लताताई देशपांडे, सुभाष कवडे, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिक्षणाचा उपयोग चरितार्थाबरोबरच माणूस समृद्ध होण्यासाठीही झाला पाहिजे, असे प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले. 'शिक्षण सेवाव्रती पुरस्कार' प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
मराठी अध्यापक संघाच्या वतीने मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. जी. कुलकर्णी यांना हा पुरस्कार पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डाॅ. लताताई देशपांडे होत्या. कवी सुभाष कवडे, शाहीर पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.
कवी पाटील म्हणाले, सामर्थ्यशाली परंपरेच्या मराठी भाषेला कुसुमाग्रजांनी आशयसंपन्न केले. या प्रतिभावंतांच्या जन्मदिनी डाॅ. कुलकर्णी यांचा गौरव होणे हे त्यांच्या शिक्षणावरील अविचल निष्ठेचे प्रतीक आहे. डाॅ. कुलकर्णी म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संस्थेचा व सहकाऱ्यांचा आहे. डाॅ. देशपांडे म्हणाल्या, प्राचार्य कुलकर्णी यांचे महाविद्यालयाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आदर्शवत आहे. सुभाष कवडे यांनी डाॅ. कुलकर्णी यांचा गौरव करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जिद्द, चिकाटी, वक्तशीरपणा या गुणांचा आदर्श घेण्याची गरज व्यक्त केली.
अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रमेश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. बजरंग संकपाळ यांनी आभार मानले. सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले.