शिक्षणप्रेमी आणि नि:स्वार्थी मार्गदर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:53+5:302020-12-07T04:19:53+5:30
देवकरभाऊंचा जन्म सर्वसामान्य, परंतु धार्मिक वृत्तीच्या सुसंस्कृत कुटुंबात झाला. आई, वडील, तसेच ज्येष्ठ बंधूंच्या मार्गदर्शनात व आशीर्वादाखाली त्यांचे लहानपण ...
देवकरभाऊंचा जन्म सर्वसामान्य, परंतु धार्मिक वृत्तीच्या सुसंस्कृत कुटुंबात झाला. आई, वडील, तसेच ज्येष्ठ बंधूंच्या मार्गदर्शनात व आशीर्वादाखाली त्यांचे लहानपण गेले. शालेय शिक्षण बलवडी (खा) या त्यांच्या जन्मगावातच पूर्ण झाले, तर माध्यमिक शिक्षण खानापूर येथे झाले. यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर पी. जी. पाटील (सर) यांचे ते आवडते विद्यार्थी होते. प्रा. भगरे सरांचे ते एनसीसीचे चांगले विद्यार्थी म्हणून ओळखले जात. यानंतर त्यांनी एम.ए.ची पदवी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे घेतली. त्यांचे सर्व शिक्षण कर्मवीरअण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत झाल्याने त्यांचे राहणीमान व जीवनावर कर्मवीरांच्या विचारांचा पगडा होता.
एक सुसंस्कृत, शांत, संयमी, परंतु करारी व्यक्तिमत्त्व असलेले भाऊ खानापूर घाटमाथ्यावरील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. जन्मत:च उत्तम देहयष्टी लाभलेले भाऊ सामाजिक, शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना चांगल्या शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. घरातील ज्येष्ठ बंधूंचा सोने-चांदी गलाईचा व्यवसाय होता. मात्र भाऊंनी व्यवसायाकडे न वळता शेतीत लक्ष घातले. घरातील लक्ष्मीची साथ घेत, त्यांनी आयुष्यभर सरस्वतीची आराधना केली. एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ मंगळवेढा येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र नोकरीतही त्यांचे मन रमले नाही. मग शेती हाच उत्तम व्यवसाय मानून त्यांनी गावात राहून शेती केली.
त्यांचे दोन्ही ज्येष्ठ बंधू व्यवसायानिमित्त म्हैसूर (कर्नाटक) येथे स्थायिक झाले. त्यांची दोन्ही ज्येष्ठ मुले धैर्यशील व विकास यांनी सुद्धा सोने-चांदी गलाईचा व्यवसाय निवडला व म्हैसूरमध्येच ते स्थायिक झाले. भाऊंनी मुलांना कोणता व्यवसाय करावा, याबाबत कोणतेही बंधन घातले नाही. जो व्यवसाय कराल, तो प्रामाणिकपणे, सचोटीने, निष्ठापूर्वक करा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या लहान मुलाने सूर्यकांतने मात्र भाऊंचा आवडता ‘शेती’ हाच व्यवसाय निवडला. पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक निर्यातक्षम द्राक्षशेती करण्यासाठी भाऊंनी सूर्यकांतला प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले.
भाऊंचा स्वभाव सर्वसमावेशक होता. त्यांना ज्येष्ठ तसेच मित्रमंडळींच्या सान्निध्यात राहण्याची मोठी आवड होती. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ते काळजी घेत. त्यांच्याजवळ गरीब-श्रीमंत तसेच जाती-पातींचा भेदभाव अजिबात नव्हता. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांचा चांगला परिचय होता. त्यांच्याजवळ जाणाऱ्यांची ते नेहमी आपुलकीने विचारपूस करायचे. त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्यांना सुद्धा ते आदराची वागणूक देत त्यांचा सन्मान राखायचे. त्यांना त्यांच्या पत्नीने शेवटपर्यंत खंबीर साथ दिली. भाऊंची तिन्ही मुले, मुलगी भाऊंच्या विचारसरणीचे असून त्यांच्या मार्गदर्शनानुसारच वाटचाल करीत आहेत.
शिक्षणाबाबत आग्रही भूमिका असणारे भाऊ शिक्षणासाठी धडपडणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे. त्यांना शाळेत, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहून मदत करायचे. खानापूरचे महात्मा गांधी विद्यालय असो, अथवा बलवडी (खा) चे जय भवानी विद्यालय असो, या शाळांमधील शैक्षणिक कार्यक्रम, निरोप समारंभ अशा कार्यक्रमांत भाऊंची उपस्थिती आवर्जून असायची. पुढील काळात अशा कार्यक्रमांत यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणार, हे मात्र नक्की.
सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांचा धार्मिक तसेच कुस्ती क्षेत्रात सक्रिय सहभाग असायचा. मंदिराची उभारणी, धार्मिक कार्यक्रम, विविध मार्गदर्शन शिबिरे यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असायचा. बलवडी, बेणापूर, खानापूर येथील दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्ती मैदानात भाऊ पंच म्हणून उपस्थित राहायचे. नवोदित कुस्ती मल्लांना मार्गदर्शन करताना आर्थिक मदत करायचे. तरुणांनी कुस्तीकडे वळावे यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले.
- प्रा. पी.एल्.भारते. बलवडी (खा)
शब्दांकन : पांडुरंग डोंगरे (खानापूर)
श्री भवानीदेवीच्या यात्रेनिमित्त बलवडी (खा) येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन करताना प्रा. शंकरराव (भाऊ) देवकर व मान्यवर.