शिक्षणाला अध्यात्माची जोड हवी
By admin | Published: December 15, 2014 10:45 PM2014-12-15T22:45:23+5:302014-12-16T00:02:22+5:30
शंकर अभ्यंकर : ‘शिकू आनंदे’ उपक्रमाची सांगलीत सांगता
सांगली : भारत देशाचे मूळ हे अध्यात्म आहे, हे विसरुन कधीही चालणार नाही. साहजिकच आपली शिक्षण प्रणाली ही अध्यात्मावर आधारितच असली पाहिजे. परंतु दुर्दैवाने सध्या तशी परिस्थिती नाही, अशी खंत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली. सांगली शिक्षण संस्था आणि लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिकू आनंदे’ या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आयोजित उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते ‘उद्याचे शिक्षण’ याविषयी बोलत होते.
अभ्यंकर म्हणाले की, मानवी जीवनच आनंदी आहे. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बिघडण्यापूर्वी मानवाला जे घडविते, त्याला शिक्षण असे म्हणतात. ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही, असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. पूर्वीची शिक्षण प्रणाली ही कष्टसाध्य होती. आजकाल मात्र त्यात बरीच सुलभता आली आहे. शिक्षण प्रणाली तयार करताना भारतीय परंपरेचा विचार होणे गरजेचे होते. परंतु बहुतांश राज्यकर्त्यांना आणि शिक्षणक्रम तयार करणाऱ्यांना येथील मातीची ओळखच नसल्याने, त्यांनी वेगळी शिक्षण प्रणाली निर्माण केली.
यामुळे भारतीय परंपरेतील सर्वच टाकावू आहे, अशी मानसिकता येथील विद्यार्थ्यांत निर्माण झाली. अध्यात्म आणि विज्ञान यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. सध्याच्या विद्यालयात ‘विद्या’ ही ‘लयाला’ जात असल्याचेच चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मूळच्या अमेरिकेतील बर्सन मॅस्किन यांनी, भारतीय संस्कृती टिकवायची असेल आणि शिक्षणाची समज लवकर यायची असेल, तर प्रत्येकाने मातृभाषेतूनच शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन केले. येथील भावे नाट्य मंदिरात प्रकाश पाठक आणि विवेक पोंक्षे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात रमेश पानसे आणि कांचन परुळेकर यांनी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. पाल्यांशी नियमित सुसंवाद कसा साधावा, याविषयीची कौशल्ये उभयतांनी सांगितली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास किशोर लुल्ला, नरेंद्र यरगट्टीकर, वसंत आपटे, नितीन खाडिलकर, जनार्दन लिमये, अरविंद मराठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय विचारप्रणाली...
प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राने त्यांच्या संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली निर्माण केली. मात्र भारत देश याला अपवाद ठरला आहे. त्यामुळेच आपण निधर्मी झालो आहोत. देशाला गौरवशाली इतिहास असताना देखील दुसऱ्यांचे ते सर्व मार्गदर्शक असते, अशीच आपल्यापैकी कित्येकांची समजूत आहे. यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेतील जे चांगले आहे त्याचा स्वीकार केलाच पाहिजे, असे मत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी सांगितले.