पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

By संतोष भिसे | Published: October 2, 2022 07:08 PM2022-10-02T19:08:56+5:302022-10-02T19:09:04+5:30

शिक्षक भरतीसाठीचे 'पवित्र पोर्टल' बंद करण्यावरुन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच आरडाओरडा झाला. संतापलेल्या केसरकरांनी उपस्थितांना सुनावले.

Educational institutions and government face off over closure of pavitra portals; Deepak Kesarkar got angry | पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

googlenewsNext

सांगली: शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने आले. सांगलीत रविवारी शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच आरडाओरडा झाला. संतापलेल्या केसरकरांनी `पाहुण्यांचा आदर करायला शिका` या शब्दांत सुनावले. महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच हा प्रकार घडला.

महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महानगरीमध्ये झाले. केसरकर प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी सुळे होत्या. सुळे यांनी केसरकर यांच्यासमोर शिक्षण संस्थांच्या मागण्या, अडचणींची जंत्री वाचली. केसरकर कार्यक्रमाला येण्यापूर्वी सुळे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी पवित्र पोर्टल बंद करण्याची मागणी केली. केसरकरांनी भाषणादरम्यान, पोर्टल बंद केले जाणार नसल्याचे संकेत दिले. त्यामुळे उपस्थितामधील एका संस्थाचालकाने मध्येच उठून `पोर्टल बंद करा` अशी ओरड केली. त्यामुळे केसरकर संतापले.

(सांगलीत रविवारी शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात स्मरणिकेचे प्रकाशन कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम आदींच्या उपस्थितीत झाले.)
 

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, पोर्टलमुळे दर्जेदार शिक्षक मिळत आहेत. ते बंद करणार नाही. मला पाहुणा म्हणून बोलावले आहे, पाहुण्यांचा आदर करायला शिका. पोर्टलचे विश्लेषण करा. त्रुटी दाखवून द्या. आरडाओरडा केला म्हणून नमून जाणारा मी मंत्री नाही. गोडगोड बोलून खुश करायला, आश्वासन द्यायला आलो नाही. एकत्र बसून प्रश्न सोडवायचे आहेत. सत्य स्वीकारायला शिका. अधिवेशनाला कामगार मंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, सुमनताई पाटील, किरण सरनाईक, महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

नवी पेन्शनच कायम ठेवण्याचे संकेत

केसरकर म्हणाले, ९९ टक्के लोकांनी नवी पेन्शन स्वीकारली आहे. तुम्हीही स्वीकार करा. न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य करु. बालकांचा मेंदू विकसीत होताना गृहपाठ योग्य नाही. अर्थात, सर्वांचाच बंद करणार नाही.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

  •  राज्यात शिक्षण संस्थाविरोधात सरकार, असे वातावरण.
  •  आरटीईचा थकीत परतावा त्वरित द्यावा.
  •  सरकारने शिक्षणासाठीची तरतुद वाढवावी
  •  शिक्षण संस्था महामंडळाचे संकेतस्थळ सुरु करणार.
  •  शिक्षण संस्थांनी प्रतिमा बदलण्यासाठी आत्मचिंतन करावे.

Web Title: Educational institutions and government face off over closure of pavitra portals; Deepak Kesarkar got angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.