सांगली जिल्ह्यात थंडीचा ताप वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 06:35 PM2022-01-12T18:35:43+5:302022-01-12T18:36:26+5:30
जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
सांगली : जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या चार दिवसांपासून स्थिर असणारे किमान तापमान बुधवारी अचानक १२ अंशापर्यंत खाली गेल्याने थंडी तापदायी होत आहे.
जिल्ह्याचे कमाल तापमान बुधवारी २९ तर किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दोन्ही प्रकारचे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशाने कमी झाले आहे. कमाल तापमान गेली काही दिवस सरासरीपेक्षा कमीच आहे, मात्र किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. त्यात अचानक घट झाली आहे.
अचानक होणारे हे बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारे ठरत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार येत्या दोन दिवसांत किमान तापमान पुन्हा वाढणार आहे.