चांदोलीला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : शिवाजीराव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:54+5:302021-02-26T04:39:54+5:30
मणदूर (ता. शिराळा) येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, हणमंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत ...
मणदूर (ता. शिराळा) येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, हणमंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, मोहन पाटील, प्रकाश जाधव, एन. डी. लोहार आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरण परिसर पर्यटकांच्यादृष्टीने विकसित करून स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले असून या विभागाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
मणदूर (ता. शिराळा) येथील सामाजिक सभागृह उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख होते. सरपंच वसंत पाटील यांनी स्वागत केले.
नाईक म्हणाले, चांदोलीसह या विभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न शिवाजीराव देशमुख व आम्ही सर्व मंडळींनी केलेला आहे. नैसर्गिकदृष्ट्या अनेक अडचणी असतानाही त्यावर मार्ग काढत या विभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न झालेला आहे. शासनाच्या अनेक योजनांमधून निधी उपलब्ध करून पायाभूत विकास साधलेला आहे. पर्यटनाच्यादृष्टीने नवनवीन प्रकल्प राबवत लोकांची पसंती मिळविण्याच्यादृष्टीने नियोजन केलेले आहे. यातून पर्यटक वाढीला चालना मिळून स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
सत्यजित देशमुख म्हणाले, चांदोली धरणामुळे या विभागाला वेगळे वैभव प्राप्त झालेले आहे. या विभागाच्या विकासाची संकल्पना शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक यांनी कायम ठेवल्यामुळे या परिसराचा विकास झाला.
यावेळी तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी सभापती हणमंतराव पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, पी. के. सुर्वे, एम. ए. थोरात, मोहन पाटील, प्रकाश जाधव, आनंदराव पाटील, एन. डी. लोहार, नाना पाटील, पांडुरंग पाटील, धनाजी पाटील, विजय महाडिक, पांडुरंग कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.