सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे वन्यजीव उपचार केंद्रासाठी प्रयत्न, पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात केंद्रच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 01:15 PM2023-12-06T13:15:22+5:302023-12-06T13:15:55+5:30

आमदार मानसिंगराव नाईक यांचा तारांकित प्रश्न 

Efforts for Wildlife Treatment Center at Shirala in Sangli District, There is no center in West Maharashtra after Pune | सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे वन्यजीव उपचार केंद्रासाठी प्रयत्न, पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात केंद्रच नाही

संग्रहित छाया

विकास शहा

शिराळा : पश्चिम महाराष्ट्रात पुण्याशिवाय अन्य कोणत्याही जिल्ह्यात वन्यप्राणी उपचार केंद्र नाही. त्यामुळे अनेक जखमी प्राण्यांना वेळेत उपचारांअभावी प्राण गमवावे लागत आहेत. चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत. त्यामुळे शिराळा येथे उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. यासंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चांदोली अभयारण्य परिसरातील वारणा, मोरणा, कृष्णा नदीकाठ, तसेच जिल्हाभरात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांच्या संचारासाठी वनक्षेत्र पुरत नसल्याने ते मानवी वस्तीत येत आहेत. रस्त्यावर वावरत आहेत. यातूनच अपघात ओढवत आहेत. अशावेळी जखमी प्राण्यावर ताबडतोब उपचार करून निसर्गात सोडणे आवश्यक असते. मात्र, यासाठी स्वतंत्र उपचार केंद्र जिल्ह्यात नाही.

कसबे डिग्रज केंद्र लालफितीत

वनविभागाने काही महिन्यांपूर्वी एका बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात एक वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्याचा सूचना केली होती. त्यानुसार सांगलीत वनविभागाच्या कार्यालयात केंद्र मंजूर झाले; पण त्याची उभारणी अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ते शिराळा येथे सुरू करण्यासाठी नाईक यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथेही केंद्र उभारणीसाठी काही दिवसांपूर्वी प्रयत्न सुरू होते; मात्र ते लाल फितीत अडकले.


पश्चिम महाराष्ट्रात सध्या फक्त पुणे येथेच उपचार केंद्र आहे. जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प; तसेच चांदोली अभयारण्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. राष्ट्रीय महामार्ग वाढत असल्याने वन्यप्राण्यांचे अपघातही वाढत आहेत. त्यांच्यावर उपचारांसाठी शिराळा मध्यवर्ती केंद्र ठरणार आहे. - आमदार मानसिंगराव नाईक
 

तासगाव, विटा आदी परिसराचा विचार करता कसबे डिग्रज, कवठेपिरान ही गावे मध्यवर्ती ठरतात. तेथे सुमारे पाच हेक्टरपेक्षा जास्त जागा मिळू शकते. तेथे उपचार केंद्र उभारणे शक्य आहे. ही जागा पूरपट्ट्यात येत नसल्याने सुरक्षितही आहे. - अजितकुमार पाटील, मानद वन्यजीव संरक्षक, सांगली

Web Title: Efforts for Wildlife Treatment Center at Shirala in Sangli District, There is no center in West Maharashtra after Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.