आठशे गणेशमूर्तींचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:18 PM2017-08-31T23:18:59+5:302017-08-31T23:19:05+5:30

Eight Ganesh idols donate | आठशे गणेशमूर्तींचे दान

आठशे गणेशमूर्तींचे दान

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती व निर्माल्याचे नदीत विसर्जन करू नये, यासाठी धडपडणाºया डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व कृष्णा व्हॅली रोटरॅक्ट क्लब यांच्या प्रबोधनाला यश येत असून, गणेशोत्सवाच्या सातव्यादिवशी गुरुवारी तब्बल आठशे गणेशमूर्तींचे दान त्यांच्याकडे आले. शिवाय सात टन निर्माल्याचे संकलन झाले. मूर्ती दानाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डॉल्फिन नेचर ग्रुप व कृष्णा व्हॅली रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत कृष्णा नदीवर मूर्ती दान उपक्रम पाचव्यादिवशीही राबविण्यात आला होता. गणेशभक्तांमधून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत शंभर मूर्ती दान झाल्या होत्या. गुरुवारीही दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते, ‘मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जित करून जलप्रदूषण करू नका’, असे आवाहन करीत होते. मूर्ती दान व निर्माल्य संकलनाचे फलक लावले होते. पर्यावरण व जलप्रदूषणाबाबत कार्यकर्ते गणेशभक्तांचे प्रबोधन करीत होते. गणेशभक्तांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाचशे मूर्ती दान झाल्या. नेमिनाथनगर येथे महापालिकेने विसर्जनासाठी कुंड ठेवले होते. तेथे शंभर मूर्तींचे विसर्जन झाले.
‘डॉल्फिन’चे अध्यक्ष प्रा. शशिकांत ऐनापुरे म्हणाले की, कुपवाड येथील कापसे प्लॉटमधील गणेशमूर्तिकारांशी संपर्क साधून, दान झालेल्या मूर्ती त्यांच्याकडे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. ज्या भक्तांनी मूर्ती दान केल्या आहेत, त्यांना पुढीलवर्षी त्या हव्या असतील, तर परत देण्याची सोय केली आहे. मूर्तीला संबंधित भक्ताच्या नावाचे लेबल लावले आहे. ज्यांना मूर्ती नको आहेत, त्या मूर्र्तींचे पुन्हा नव्याने रंगकाम करून कमी-जास्त दराने त्यांची विक्री केली जाणार आहे.
‘डॉल्फिन’चे प्रा. ऐनापुरे, कार्याध्यक्ष अरुण कांबळे, सचिव डॉ. पद्मजा पाटील, राहुल साळुंखे, वैभव सोळस्कर, दिनेश पाटील, अर्चना ऐनापुरे, सचिन चोपडे, लक्ष्मण भट, विकास सावंत, अविष्कार माळी, विकास आवळे, नित्या पाटील, आदिती कुंभोजकर, ओमकार पाटील, असिफ मुजावर, पवन भोकरे, उज्ज्वल साठे आदी या भाविकांच्या प्रबोधन मोहिमेत गुरुवारी सहभागी झाले होते.
वाळव्यात विसर्जन उत्साहात : प्रदूषण मुक्तीच्या चळवळीस प्रतिसाद
वाळवा : ‘गणपतीबाप्पा मोरया... पुढच्यावर्षी लवकर याऽऽ, मंगलमूर्ती मोरयाऽऽ, गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हालाऽऽ’च्या जयघोषात वाळवा येथील काही सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे तसेच घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन गुरुवारी, सातव्या दिवशी करण्यात आले. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती आणि क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, वीर सेवा दलाचे राहुल कोले, बजरंग गावडे, ज्ञानराजा मंडळाचे नीलेश थोरात, नारायण पवार तसेच कार्यकर्ते, हाळभाग-वाळवा वीर सेवा दलाचे संघनायक विजय नवलेंसह सदस्य यांनी यावेळी नागरिकांना मार्गदर्शन केले. पूजेचे साहित्य नदीत टाकू नका, मूर्ती दान करा, नदीत टाकू नका, पाणी हेच जीवन आहे, कृष्णामाई प्रदूषित करू नका, असे सांगून त्यांनी प्रबोधन केले. त्याला प्रतिसादही मिळाला. युवा सामाजिक प्रतिष्ठान, ज्ञानराजा मंडळ, वीर सेवा दल यांनी ठेवलेल्या निर्माल्य कुंडात लोकांनी निर्माल्य दान दिले व मूर्तीही दान केल्या. नदीतिरी रस्त्याच्या दुतर्फा ‘नदीचे पाणी स्वच्छ तर आपले जीवन स्वच्छ, कृपया नदीमध्ये निर्माल्य टाकू नका. निर्माल्य कुंडाचा वापर करा’ असे फलक लावून समाजप्रबोधन करण्यात आले होते. राहुल कोले, नीलेश थोरात, नारायण पवार, बजरंग गावडे, योगेश नवले, विकास शेटे, राजेंद्र हिंगणे, पार्श्व भिलवडे, संजय नवले, राजा भिलवडे, तलाश नवले, विजय गुणधर नवले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाच ट्रॉल्या निर्माल्य दान स्वीकारले. यापासून चारा व खत बनविण्यात येईल.

Web Title: Eight Ganesh idols donate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.