कुरळप येथे आश्रमशाळेत आठ मुलींचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:03 AM2018-09-27T00:03:37+5:302018-09-27T00:03:41+5:30
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी निनावी पत्राद्वारे उघडकीस आला.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आठ मुलींचे शोषण झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संस्थेचा संस्थापक व शिवसेनेचा माजी तालुकाप्रमुख अरविंद आबाजी पवार (वय ६०, रा. मांगले, ता. शिराळा) व त्याला मदत करणारी महिला कर्मचारी मनीषा कांबळे यांना बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कुरळप पोलिसांनी अटक केली आहे.
कुरळप येथे वारणा-मोरणा शिक्षण संस्थेची मिनाई प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. अरविंद पवार हा या आश्रमशाळेचा संस्थापक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या आश्रमशाळेत मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची चर्चा होती. संस्थापकाच्या कृष्णकृत्याला मुलींच्या निनावी पत्राद्वारे वाचा फुटली आहे.
दोन दिवसांपूर्वी कुरळप पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना एक निनावी पत्र मिळाले. यामध्ये मिनाई आश्रमशाळेत मुलींच्या शोषणाबाबत माहिती देण्यात आली होती. आश्रमशाळेतील काही मुलींनीच हे पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये सर्व घटना मुलींनी सविस्तर दिली होती. नराधम पवार यांच्याकडून होत असलेल्या अत्याचारातून आमची सुटका करा, अशी आर्त विनवणी या पत्रातून केली होती. हे पत्र हाती मिळताच निरीक्षक चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन साध्या वेषात पोलिसांनी शाळेत जाऊन मुलींना विश्वासात घेतले. त्यांच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली.
यानंतर उपविभागीय अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या पथकाने अरविंद पवार याला मांगले ते कुरळप रस्त्यावर ताब्यात घेतले. त्याला कुरळप पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेत जाऊन तपासणी सुरू केली. या कारवाईबाबत कोणालाच माहिती नव्हती. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. निर्भया पथकाच्या कोमल पवार यांच्यासह पथकाने दिवसभर शाळेत थांबून मुलींचे जबाब नोंदवून घेतले.
जबाबातून मिळालेल्या माहितीनुसार पवार याला घाबरून मुली अत्याचार सहन करीत होत्या. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पवार यांनी आजवर अनेक मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. त्याच्या अत्याचारास कंटाळून मुलींनी थेट पोलिसांना पत्र लिहिल्याने या घटनेला वाचा फुटली.
दुपारी पोलिसांनी अत्याचारग्रस्त मुलींच्या पालकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी शाळेकडे धाव घेतली. मात्र शाळेत कोणीच नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.
शाळेतील अनेक गैरप्रकार पवार याने राजकीय वजन वापरून मिटविल्याची चर्चा आहे. शाळेतील एका कर्मचाºयाचा संशयास्पद मृत्यू, विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीच्या तिसºया मजल्यावरून केलेला आत्महत्येचा प्रयत्न, याशिवाय शिपायाकडून विद्यार्थ्यास मारहाण, अशी अनेक प्रकरणे पवार याने दाबल्याची चर्चा आहे. याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
शाळेत घडणाºया दुष्कृत्यांची शिक्षकांनाही कुणकुण लागली होती, मात्र नोकरीच्या भीतीपोटी ते पवार याच्याविरोधात बोलण्याचे धाडस करीत नव्हते. काही मुलींनी या प्रकाराबाबत शिक्षकांना माहिती देण्याचा प्रयत्नही केला, मात्र पवार याच्या दबावामुळे शिक्षकांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, असेही सांगण्यात आले. अखेर काही मुलींनी थेट पोलिसांना निनावी पत्र लिहिल्याने या प्रकरणाला वाचा फुटली.
भाचा अधीक्षक, पत्नी स्वयंपाकीण
मिनाई आश्रमशाळेचा अरविंद पवार हा संस्थापक आहे. त्याने आपला भाचा सुभाष पाटील याची आश्रमशाळेवर अधीक्षक म्हणून नेमणूक केली आहे, तर पत्नी नंदा पवार हिचेही नाव स्वयंपाकीण म्हणून आश्रमशाळेच्या मस्टरवर घेतले आहे. तिच्या बदली मनीषा कांबळे हिला स्वयंपाकाच्या कामासाठी नेमले होते. तिच्या माध्यमातूनच तो या मुलींवर अत्याचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
अत्याचारापूर्वी गोळ्या खायला दिल्या...
उपनिरीक्षक चव्हाण यांच्यापुढे मुलींनी अत्याचाराचा पाढाच वाचला. अत्याचार करण्यापूर्वी पवार मुलींना काही गोळ्या खायला देत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याला यासाठी आश्रमशाळेतील मनीषा कांबळे ही महिला मदत करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी किशोर काळे यांनी दिली.
‘गाडी बाजूला घ्या, मिटवूया’
पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कुरळप पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी मांगलेकडे रवाना झाले. वाटेतच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला घेऊन कुरळपला परतत असताना त्याने पोलिसांना ‘जरा काम आहे, जरा बोलूया, गाडी बाजूला घ्या’ असे म्हणत गाडी रस्त्याकडेला घेण्यास भाग पडले. यानंतर ‘काय प्रकरण आहे ते आपसात मिटवूया’ असे म्हणत पोलिसांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास न जुमानता पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून अटकेची कारवाई केली.