आठशेवर सेवा करदाते केंद्रीय जीएसटीच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:22+5:302021-01-08T05:25:22+5:30
आयकर विभागाकडून केंद्रीय जीएसटी विभागाला सेवा करदात्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांनी आयकर विवरण पत्रात नमूद ...
आयकर विभागाकडून केंद्रीय जीएसटी विभागाला सेवा करदात्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांनी आयकर विवरण पत्रात नमूद केलेल्या सेवांची माहिती व सेवाकर भरणा यातील तफावतीबद्दल संबंधितांना खुलासा विचारण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा असेल त्यांची तपासणी बंद होणार आहे. मात्र खुलासा समाधानकारक नसेल किंवा तपासणीला उत्तर न देणाऱ्या सेवा करदात्यांना जीएसटी विभागातर्फे आयकर माहितीवर आधारित कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. सुमारे आठशेवर सेवा करदात्यांना सेवा कर भरण्यासाठी जीएसटी विभागाने कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. यात मंगल कार्यालय, केटरिंग, सरकारी ठेकेदार, इतर ठेकेदार, शीतगृहे चालक, कमिशन एजंट, वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे. या सर्वाकडे सुमारे २० कोटीहून अधिक रकमेच्या सेवा कराची मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय जीएसटी विभागाकडे आता राज्य विक्रीकर विभागाकडूनही नोंदणीकृत व्यवसाय व उद्योगांच्या विक्रीची माहिती उपलब्ध होत असून, त्याआधारे संबंधितांकडून खुलासा मागविण्यात व कारणे दाखवा नोटिसा देण्यात येत असल्याचे जीएसटी अधिकाऱ्यांनी सांगितले. जीएसटी विभागाच्या सेवाकर वसुली नोटिसांमुळे उद्योजक, व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.