संघटित गुन्हेगारीबद्दल आठजणांवर गुन्हा
By Admin | Published: July 10, 2014 11:14 PM2014-07-10T23:14:41+5:302014-07-10T23:17:18+5:30
कृषी साहित्याची चोरी : पोलिसांची कारवाई
विटा : कृषी साहित्यासह अन्य चोरीच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई होऊनही संघटित गुन्ह्यापासून परावृत्त न झालेल्या खानापूर तालुक्यातील आठ संशयितांवर विटा पोलिसांत संघटित गुन्हेगारीप्रकरणी पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला.
लहू हणमंत गुजले, नाना महादेव मंडले, सागर बाळासाहेब गुजले, पप्पू गोविंद गुजले (सर्व रा. लेंगरे), विनोद आनंदा गुजले (रा. वाळूज) यांच्यासह सिध्देश्वर शंकर तुपसौंदर्य, नितीन मल्हारी ठोंबरे व सागर दिनकर गायकवाड (सर्व रा. बलवडी खा.) या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर गेल्या वर्षभरापूर्वी कृषिपंप, तांब्याच्या तारा, डिझेल व एचटीपी पंप चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला होता.
दि. ९ नोव्हेंबर २०१३ च्या दरम्यान खानापूर तालुक्यातील लेंगरे, देविखिंडी परिसरातून लहू गुजले, नाना मंडले, विनोद गुजले, सागर गुजले, पप्पू गुजले यांनी डिझेल, एचटीपी पंप, ३ इलेक्ट्रीक कृषिपंप असे एकूण ६८ हजार ३७९ रूपयांचे साहित्य लंपास केले होते. त्यांना यापूर्वी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात बलवडी (खा.) परिसरात याच कालावधित सिध्देश्वर तुपसौंदर्य, नितीन ठोंबरे व सागर गायकवाड यांनी पवनचक्कीच्या तांब्याच्या तारा व इलेक्ट्रीक कृषिपंप असे एकूण २ लाख ८४ हजार रूपयांचे साहित्य लंपास केले होते. त्यांनाही अटक करून मुद्देमाल जप्त केला होता.
परंतु, या चोरी प्रकरणात कारवाई होऊनही या आठजणांमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. चोऱ्यांचे प्रकार सुरूच राहिले. त्यामुळे विटा पोलीस ठाण्याचे हवालदार महादेव खोत व विठ्ठल शेळके यांनी या आठजणांवर संघटीत गुन्हेगारीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पवार करीत आहेत. (वार्ताहर)