अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला आठ वर्षे सक्तमजुरी; सांगली न्यायालयाचा निकाल, आरोपी मिरजेचा
By शीतल पाटील | Published: October 30, 2023 08:16 PM2023-10-30T20:16:44+5:302023-10-30T20:17:27+5:30
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड काढणाऱ्याला तरुणाला सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. हातरोटे यांनी आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सांगली: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड काढणाऱ्याला तरुणाला सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. हातरोटे यांनी आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रवीण सुरेश सन्नके (२८, रा. मालगाव रोड, दत्त काॅलनी, मिरज) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी प्रवीण सन्नके हा पिडीत मुलीचा पाठलाग करून तु मला आवडतेस, असे म्हणून तिच्या भावाला ठार मारण्याची व स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देत होता. वारंवार पाठलाग करून तिची छेडछाडही काढत होता. पिडीत मुलीच्या आईने याबाबत मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
सहाय्यक निरीक्षक आय. एस. वर्धन यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी युक्तीवाद केला. आरोपीला यापूर्वीही पोक्सोतर्गंत गुन्ह्यात दहा वर्षाची शिक्षा झाली होती. त्याच्यावर इतर गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे आरोपीला सहानभूती दाखवू नये, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने आरोपी प्रविण याला दोषी धरून आठ वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील सहा हजार रुपये पिडीत मुलीला देण्याचे आदेशही दिले. या खटल्यात मिरज पोलिस ठाण्याकडील शशिकांत पाटील, पैरवी कक्षातील सुनीता आवळे, रेखा खोत यांनी मदत केली.