जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली

By अविनाश कोळी | Published: September 20, 2022 01:12 PM2022-09-20T13:12:32+5:302022-09-20T13:35:57+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जिल्ह्यातील शिवसेना फोडण्यात फार मोठे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीकडे मोर्चा वळविला आहे.

Eknath Shinde group preparing to shock Jayant Patil in Sangli, Disgruntled corporators contacted ex officers | जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली

जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली

Next

अविनाश कोळी

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जिल्ह्यातील शिवसेना फोडण्यात फार मोठे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीकडे मोर्चा वळविला आहे. सांगली, मिरजेतील राष्ट्रवादीचे नाराज नगरसेवक, माजी पदाधिकाऱ्यांशी शिंदे गटाने संपर्क साधला असून काही नाराजांनी स्वत:हून शिंदे गटाशी चर्चा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठा धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री गटाने केली आहे.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. विशेषत: मिरजेत नगरसेवकांची संख्या अधिक आहे. दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्त्यांची टीमही मजबूत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळली आहे. गटबाजीचे काही प्रकार उघड झाले, तर काही नाराजांनी ते उजेडात आणले नाहीत. योग्य संधीच्या शोधात काहीजण थांबले होते. राज्यातील सत्तांतराने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नाराजांनाही एक पर्याय दिला आहे. शिंदे गटाचा हा पर्याय या सर्वांना सोपा वाटतो. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सुरु केली आहे.

महापालिकेच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीची गटबाजी उघडकीस आली. दोन नगरसेविकांची अनुपस्थिती राष्ट्रवादीला धक्का देणारी ठरली. हा धक्का एवढ्यापुरता मर्यादित नाही. एकनाथ शिंदे गटाने त्यापुढे जाऊन या नाराजांसह अन्य आजी - माजी पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची ‘फिल्डिंग’ लावली आहे. चर्चेच्या प्राथमिक फेऱ्यांत काही नगरसेवक व माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला हिरवा कंदिल दर्शविल्याचेही समजते. सांगली, मिरजेतील राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग आला आहे.

गटबाजीची उदाहरणे

  • राष्ट्रवादीच्या जिल्हा सचिवाला दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली.
  • मारहाणीच्या घटनेनंतर सचिवाचीच हकालपट्टी
  • काही महिन्यांपूर्वी मिरजेतील राष्ट्रवादीच्या एका गटाने दुसऱ्या गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल केला.
  • जयंत पाटील यांच्या संवाद यात्रेतही भर सभेत ॲड. अमित शिंदे यांनी गटबाजीचा उल्लेख केला.


बेदखल करण्याची भूमिका धोक्याची

पक्षातील वाढत्या गटबाजीकडे जयंत पाटील यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. पक्ष म्हटल्यावर असे चालायचे, अशा भूमिकेतून त्यांनी प्रत्येक गोष्ट बेदखल केली. त्यामुळे आता पक्षातील अनेकजण दुसऱ्या गटात जाण्याची तयारी करीत आहेत.

नाराजी नेत्यांवर नव्हे, पदाधिकाऱ्यांवर

नाराजांनी अनेकदा जयंत पाटील यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. मात्र, पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी नाराजी स्पष्ट केली. अडचणीच्या काळात पक्षाकडून मदत होत नसल्याचीही तक्रार आहे.

Web Title: Eknath Shinde group preparing to shock Jayant Patil in Sangli, Disgruntled corporators contacted ex officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.