वृद्ध दाम्पत्याचे सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:50+5:302020-12-29T04:26:50+5:30
विटा : घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून किराणा साहित्य घेण्यास गेलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे ...
विटा : घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून किराणा साहित्य घेण्यास गेलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे २ लाख २७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र, कपाटातील रोख २५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली नाही. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास माहुली (ता. खानापूर) येथे घडली.
माहुली येथील सेवानिवृत्त बॅँक कर्मचारी बाळकृष्ण एकनाथ बारसिंग (वय ६५) व त्यांची पत्नी असे दोघे राहत आहेत. शुक्रवारी बाळकृष्ण बारसिंग हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरी त्यांची वृद्ध पत्नी एकटीच होती. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बारसिंग यांची पत्नीही किराणा साहित्य घेण्यासाठी घराच्या दरवाजाला कुलूप न लावता बाहेरून कडी लाऊन दुकानात गेल्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी काढून कपाटातील डब्यात ठेवलेले ३० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, प्रत्येकी तीन ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २५ ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट, १० ग्रॅम वजनाची कर्णफुले असे २ लाख २७ हजार ५०० रुपयांचे ९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी कपाटाचा व घराचा दरवाजा पूर्वीप्रमाणे बंद करून तेथून पोबारा केला. हा प्रकार शनिवारी बारसिंग पती-पत्नीच्या निदर्शनास आला. याप्रकरणी बाळकृष्ण बारसिंग यांनी विटा पोलिसांत घटनेची फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक आर. के. कसबेकर पुढील तपास करीत आहेत.