Sangli: गिलाव्यास विरोध केल्याने वृद्धास पत्र्यावरून फेकले, गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:08 IST2025-04-19T14:08:25+5:302025-04-19T14:08:48+5:30
सांगली : घराच्या पत्र्यावर उभे राहून गिलावा करू नका, असे समजावून सांगणाऱ्या शमशुद्दीन कुरणे (वय ६०, रा. शंभरफुटी रस्ता, ...

Sangli: गिलाव्यास विरोध केल्याने वृद्धास पत्र्यावरून फेकले, गंभीर जखमी
सांगली : घराच्या पत्र्यावर उभे राहून गिलावा करू नका, असे समजावून सांगणाऱ्या शमशुद्दीन कुरणे (वय ६०, रा. शंभरफुटी रस्ता, रज्जाक गॅरेजमागे, सांगली) यांना बांबूने मारून पत्र्यावरून खाली फेकल्याचा प्रकार गुरुवारी घडला.
याबाबत कृष्णा सखाराम घेरडे व आकाश सखाराम घेरडे (रा. शंभरफुटी रस्ता) या दोघा भावांवर खुनी हल्ल्याबद्दल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उलसुम शमशुद्दीन कुरणे (वय ५४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
शंभरफुटी रस्ता परिसरातील कुरणे व शेजारील घेरडे यांच्यात वाद आहे. दि. १७ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घेरडे हे घराला गिलावा करण्याचे काम करत होते. त्यासाठी दोघे जण कुरणे यांच्या मालकीच्या घराच्या पत्र्यावर उभे राहिले होते. कुरणे यांनी दोघांना पत्र्यावर उभे राहून गिलावा करू नका, असे समजावून सांगत होते. तेव्हा कृष्णाने लाकडी बांबूने कुरणे यांच्या डोक्यात मारले.
आकाशनेदेखील दुसरा बांबू घेऊन मारण्यास सुरुवात केली. कुरणे यांची पत्नी उलसूम या भांडण सोडवण्यासाठी आल्या. तेव्हा त्यांना दोघांनी ढकलून दिले. दोघांनी कुरणे यांना ‘तुला जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून पत्र्यावरून उचलून फेकले. त्यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी दुखापत होऊन ते निपचित पडले. उलसूम यांनी पती शमशुद्दीन यांना तातडीने उपचारास दाखल केले. पती शमशुद्दीन यांच्यावर उपचार केल्यानंतर उलसूम यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा व आकाश घेरडे या दोघांवर खुनी हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.