Maharashtra Vidhan Sabha 2019 : जिल्ह्यात निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 04:19 PM2019-10-11T16:19:18+5:302019-10-11T16:20:56+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे नऊ दिवस राहिल्याने उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सभा, बैठका, रॅलीद्वारे प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. चुरशीच्या मतदारसंघात तर उमेदवारांसह त्यांचे संपूर्ण कुटुंबही प्रचारात उतरले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे.
सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे नऊ दिवस राहिल्याने उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सभा, बैठका, रॅलीद्वारे प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. चुरशीच्या मतदारसंघात तर उमेदवारांसह त्यांचे संपूर्ण कुटुंबही प्रचारात उतरले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत लढती होत आहेत. त्यात शिराळा, जत, इस्लामपूर या तीन मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. शिराळ्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक व बंडखोर सम्राट महाडिक अशी तिरंगी लढत आहे. तिन्ही उमेदवारांनी सभा, बैठका, घरोघरी भेटीवर भर दिला आहे.
इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासमोर शिवसेनेचे गौरव नायकवडी व भाजपचे बंडखोर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. जयंत पाटील हे राज्यातील इतर उमेदवारांच्या प्रचारात मग्न आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यात पाटील हेही गावभेटी देऊन इतर उमेदवारांच्या प्रचाराला जात आहेत. नायकवडी व निशिकांत पाटील यांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे.
जतमध्ये भाजपचे आ. विलासराव जगताप व काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यातील पारंपरिक लढतीत बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांनी एन्ट्री घेतल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. जगताप यांच्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली, तर सावंत यांच्या प्रचाराचा प्रारंभ कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तीनही उमेदवारांनी प्रचाराचा जोर धरला आहे. गावोगावी सभा, बैठका घेऊन रान तापविले जात आहे.
सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. शिवसेनेचे नेते शेखर माने हेही अपक्ष लढत आहेत. माने यांना मनसेने पाठिंबा दिला आहे. पाटील, गाडगीळ यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. सकाळच्या टप्प्यात ग्रामीण भागात रॅली, सभा, तर सायंकाळी सांगली, कुपवाड शहरात पदयात्रांवर उमेदवारांनी भर दिला आहे. मिरजेत भाजपचे आ. सुरेश खाडे व स्वाभिमानीचे बाळासाहेब होनमोरे हे दोघेही मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील व शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांच्यात लढत आहे. सुमनतार्इंच्या प्रचाराची सुरूवात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यांचे चिरंजीव रोहित, दीर सुरेश यांच्यासह कुटुंबीय प्रचारात सक्रिय आहेत. तसेच घोरपडे यांच्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनीही जोर लावला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील वातावरणही चांगलेच तापले आहे.
खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर व अपक्ष सदाशिवराव पाटील यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. बाबर व पाटील यांचे संपूर्ण कुटुंबीय प्रचारात सहभागी आहे. पाटील यांना काँग्रेस व राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे, तर आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख गटाचा अद्याप निर्णय झालेला नाही.
पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांच्यात सामना रंगला आहे. कदम यांना क्रांती समूहाने पाठिंबा दिला आहे, तर विभुते यांच्यासाठी भाजपचे आ. पृथ्वीराज देशमुख, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जोर लावला आहे. एकूणच आठही मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू आहे.