सांगली मनपा क्षेत्रात इव्हेंट कंपन्यांचा तळ वेध निवडणुकीचे : प्रभागाचे सर्वेक्षण; प्रचारासाठी लाखोंचे पॅकेज; राजकीय पक्ष, नगरसेवकांना गळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:10 AM2018-01-12T01:10:07+5:302018-01-12T01:11:31+5:30
सांगली : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच खासगी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांनी येथे तळ ठोकला आहे. इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रभागाचे सर्वेक्षण, मतदारांचा अंदाज, इच्छुकांची समाजातील प्रतिमा याचे आकलन करून अहवाल तयार करून दिला जात आहे.
शीतल पाटील ।
सांगली : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच खासगी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांनी येथे तळ ठोकला आहे. इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रभागाचे सर्वेक्षण, मतदारांचा अंदाज, इच्छुकांची समाजातील प्रतिमा याचे आकलन करून अहवाल तयार करून दिला जात आहे. सोशल मीडियावरून हायटेक प्रचारासाठी लाखोंची पॅकेजेस आहेत. कमी पैशात नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाºयांनी या कंपन्यांकडून काम करून घेण्यास सुरुवात केली आहे. काही राजकीय पक्षांनी स्वतंत्ररित्या अशा कंपन्यांची नियुक्ती केली आहे.
महापालिकेची निवडणूक जून-जुलै महिन्यात होणार आहे. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे सध्याच्या प्रभागापेक्षा आताचा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला असेल. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात गावठाण भागातील प्रभागांची संख्या फारच कमी आहे. महापालिकेचा विस्तार उपनगरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे चार सदस्यीय प्रभाग रचनेत उपनगरातील विस्तारलेल्या भागात उमेदवारांची कसोटी लागणार आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना शक्य होणार नाही. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात सर्वसाधारण २० ते २५ हजार मतदारसंख्या असल्याने उमेदवारांनाही अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
नेमक्या याच बाबींचा फायदा काही ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात सात ते आठ कंपन्यांनी प्रभागाचा सर्वेक्षण करून देण्याचे आमिष उमेदवारांना दाखविण्यास सुरुवात केली आहे. काही कंपन्या जिल्ह्याबाहेरील आहेत. काही खासगी व्यक्तींनीही जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवार, विद्यमान नगरसेवकांची भेट घेऊन कशा पद्धतीने अहवाल देणार, याचे सादरीकरणही केले जात आहे. काही नगरसेवकांनी खासगी व्यक्तीमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी काही जणांचे ३० हजारांपासून ५० हजारांपर्यंत पॅकेज आहे. कंपन्यांचा दर मात्र लाखोंच्या घरात आहे. एक कंपनी एकाच पक्षाचे काम करीत आहे. सध्याच्या प्रभागातील मतदारांचा कल, विद्यमान नगरसेवक, सत्ताधाºयांबद्दल असलेले मत, इच्छुक उमेदवाराची प्रतिमा, प्रभावहिन भागात प्रभाव वाढविण्यासाठीचे उपक्रम या साºयांचे मार्गदर्शन या कंपन्या करीत आहेत. सध्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने या कंपन्यांची दिवाळी साजरी होणार आहे.
राजकीय पक्ष : सरसावले
महापालिका निवडणुकीसाठी मतदारांचा अंदाज घेण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे फॅड गेल्या काही वर्षात राजकीय पक्षांतही मोठ्या प्रमाणात रुजले आहे. महापालिकेच्या सत्तेचे स्वप्न पाहणाºया भाजपने तर एका बड्या कंपनीला हे काम दिले असल्याचे बोलले जाते. या कंपनीकडून तीन ते चार महिन्यापासून काम सुरू आहे. आतापर्यंत कंपनीने तीन अहवाल भाजपला दिल्याचे समजते. पण त्या अहवालांचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडूनही काहीजणांनी स्वतंत्र कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. नगरसेवकांकडूनही वैयक्तिकरित्या मतदारांचा अंदाज घेतला आहे. काही खासगी व्यक्तींकडून हे काम सुरू आहे. काहीजण कुटुंबसंख्येवर पॅकेज ठरवत आहेत. एका घराच्या सर्वेक्षणासाठी १७ रुपये दर आहे, तर काहींचा दर त्यापेक्षाही अधिक आहे. जेवढ्या घरांचे सर्वेक्षण होईल, तितकी रक्कम कंपनीला द्यावी, अशी विविध पॅकेजीस् सध्या उपलब्ध आहेत.
प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी जातात. थेट महापालिका निवडणुकीबाबत मतदारांना न विचारता इतर माहिती घेतली जाते. त्यासाठी खास युक्ती वापरली जात आहे.
काहीजण आरोग्य सेवेचे सर्वेक्षण सुरू असल्याचे भासवून मतदारांपर्यंत जातात. सुरूवातीला घरात किती लोक आहेत, याची माहिती घेतली जाते.
त्यानंतर रेशन कार्ड, आधारकार्ड, गेल्या महिन्याभरात डेंग्यू, चिकुनगुन्या झाला आहे का, असे दहा ते पंधरा प्रश्न विचारले जातात. कागदावरील प्रश्नावली संपल्यानंतर या प्रतिनिधीचे काम सुरू होते. विद्यमान सत्ताधाºयांबद्दल समाधानी आहात का, नगरसेवकाचे काम कसे आहे, कोणत्या राजकीय पक्षाचे काम आवडते, असे प्रश्न मतदारांना विचारले जातात. त्यातून तो कोणाला मत देईल, याचा अंदाज बांधला जातो. असे प्रत्येक घरापर्यंत पोहोचून इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, खासगी सर्वेक्षण करणारे प्रतिनिधी अहवाल तयार करतात.
याच बाबींचा फायदा काही ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांना
२० ते २५ हजार सर्वसाधारण
मतदारसंख्या प्रत्येक प्रभागात
काही नगरसेवकांनी खासगी व्यक्तीमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी काही जणांचे
३० पासून ५० हजारांपर्यंत
पॅकेज उपलब्ध आहे.