मिरज पंचायत समिती सभापतीची ६ जुलैला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:00+5:302021-06-24T04:19:00+5:30
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवड ६ जुलै ...
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवड ६ जुलै रोजी होणार आहे. सभापतीपदासाठी भाजप व महाविकास आघाडी या दोन्ही गटात हालचालींना वेग आला आहे.
मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाचा त्रिशला खवाटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत समितीत भाजपचे बहुमत होते; मात्र गत उपसभापती निवडीत भाजपच्या दोन सदस्यांनी बंडखोरी करीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे अनिल आमटवणे यांच्याकडे उपसभापतीपद आले.
सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाच्या महाविकास आघाडीकडे बहुमत असले तरी सभापती निवडीत बहुमताचे कोणाचे पारडे जड होणार हे गुलदस्त्यात आहे. सभापतीपदासाठी भाजपकडून बेडगच्या गीतांजली कणसे यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपच्या अंतर्गत मतभेदाचा फायदा उचलत उपसभापतीबरोबर सभापतीपद महाविकास आघाडीकडे खेचून आणण्याच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. आघाडीकडून तुंगच्या जयश्री डांगे यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या भाजपकडे १० व महाविकास आघाडीकडे ९ व पाठिंबा दिलेल्या भाजपच्या दोन सदस्यासह ११ सदस्यांचे सध्याचे संख्याबळ आहे.
चौकट
या दोन सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष
गत उपसभापतीपदाच्या निवडीत आघाडीला समर्थन देऊन शुभांगी सावंत व सुनीता पाटील या भाजपच्या दोन सदस्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. सभापतीपदाच्या निवडीत या दोन महिला सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या सदस्यांचे कोणत्या पक्षाला समर्थन राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.