आमदारकी वाचली, पण..; सांगली जिल्ह्यातील उमेदवारांच्या मतांच्या आकड्यांचे अजब गणित..जाणून घ्या

By अविनाश कोळी | Published: November 28, 2024 05:52 PM2024-11-28T17:52:07+5:302024-11-28T17:53:24+5:30

सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ येथील निकालांमधील आकडेवारी रंजक

Election results of all eight constituencies of Sangli district have been announced | आमदारकी वाचली, पण..; सांगली जिल्ह्यातील उमेदवारांच्या मतांच्या आकड्यांचे अजब गणित..जाणून घ्या

आमदारकी वाचली, पण..; सांगली जिल्ह्यातील उमेदवारांच्या मतांच्या आकड्यांचे अजब गणित..जाणून घ्या

अविनाश कोळी

सांगली : आकडे बऱ्याच गोष्टी स्पष्ट करतात; पण आकडे अनाकलनीय गणितही मांडतात. विधानसभा निवडणूक निकालाने असेच अजब आकडे पुढे आणले आहेत. काही आमदारांना मागील निवडणुकीएवढीच मतांची टक्केवारी मिळूनही ते मोठ्या विजयापर्यंत पोहोचले, तर काहींना तितक्याच मतात पराभव स्वीकारावा लागला. काही आमदारांना विजय मिळूनही मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण सहन करावी लागली.

जिल्ह्यातील आठही मतदारसंघात यंदा धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. या निवडणुकीत चार आमदार विजयी, दोन पराभूत तर दोघा माजी आमदारांच्या वारसदारांना विजय मिळाला. ज्यांची आमदारकी वाचली त्यांच्या मतांच्या टक्केवारीची मागील निवडणुकीतील आकड्यांशी तुलना केल्यानंतर अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ येथील निकालांमधील आकडेवारी रंजक आहे.

टक्केवारीत वाढ न होता गाडगीळांचा मोठा विजय

२०१९च्या निवडणुकीत सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना ४९.६३ टक्के मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांना ४९.७६ टक्के मते मिळाली. तरीही त्यांनी ३६ हजार १३५ मतांनी विजय मिळविला. काँग्रेसमधील मतांच्या विभाजनाचा त्यांना लाभ मिळाल्याचे दिसून येते.

टक्केवारीत घट न होता मानसिंगराव नाईक पराभूत

शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना २०१९ मध्ये ४४.४६ टक्के मतांत विजय प्राप्त झाला होता. यंदा त्यांना ४४.३१ टक्के इतकी म्हणजे जवळपास तितकीच मते मिळूनही त्यांच्या पदरात पराभव पत्करावा लागला. याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये सम्राट महाडिक यांना मिळालेली २० टक्के मते भाजप उमेदवाराच्या पदरात पडली.

आमदारकी वाचली त्यांची टक्केवारी

आमदार  - २०१९ - २०२४ - फरक

  • विश्वजित कदम - ८३.०४ - ५५.८८ - २७.५६
  • सुधीर गाडगीळ - ४९.६३ - ४९.७६ - ०.१३
  • जयंत पाटील - ५७.७८ - ५१.७२ - ६.०६
  • सुरेश खाडे - ५३.५७ - ५६.७ - ३.१३


वारसदारांची कामगिरी कशी?

  • तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार रोहित पाटील यांना या निवडणुकीत ५४.०९ टक्के मते मिळाली. मात्र, त्यांच्या आई माजी आमदार सुमनताई पाटील यांना २०१९च्या निवडणुकीत ६३.७८ टक्के मते मिळाली होती. तुलनेत त्यांना ९.६९ टक्के मते कमी मिळाली.
  • खानापूर मतदारसंघात २०१९ मध्ये दिवंगत शिंदेसेनेचे नेते अनिल बाबर यांना ५३.९४ टक्के मते मिळाली होती. त्यांच्यापेक्षा ७.२ टक्के अधिक म्हणजेच ६१.१४ टक्के मते मिळवित मोठा विजय नोंदविला.


विक्रम सावंत यांच्या मतांमध्ये १४ टक्क्यांनी घट

काँग्रेसचे जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांना भाजपमधील बंडखोरीचा फायदा झाला नाही. याउलट त्यांच्या मतांच्या टक्केवारीत २०१९च्या तुलनेत १४.२६ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.

Web Title: Election results of all eight constituencies of Sangli district have been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.