कॉलेज कॅम्पसमध्ये निवडणुकांचे वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:47 PM2019-07-18T23:47:48+5:302019-07-18T23:49:17+5:30
राजकीय पक्षांशी संबंधित संघटनांनी नव्या नियमावलीबद्दल नाराजी व्यक्त केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. नव्या नियमावलीस संभ्रमावस्था, वाद या गोष्टींचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. आॅगस्टअखेरपर्यंत निवडणुका पार पडतील, अशी शक्यता आहे.
अविनाश कोळी ।
सांगली : प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे वादळ घोंगावू लागले आहे. येत्या ३१ जुलैपूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी संघटनांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांशी संबंधित संघटनांनी नव्या नियमावलीबद्दल नाराजी व्यक्त केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ अंतर्गत या निवडणुका होत आहेत. लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा, यासाठी या निवडणुका होत असून, त्यासाठी स्वतंत्र नियमावली व आचारसंहिता लागू केली आहे. त्यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करून संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये आता त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रदीर्घ कालखंडानंतर होत असलेल्या निवडणुकांमुळे विद्यार्थी संघटना, विद्यार्थी यांच्यात चैतन्य निर्माण झाले असून, महाविद्यालयात राजकीय वातावरणही तापले आहे. नव्या नियमावलीस संभ्रमावस्था, वाद या गोष्टींचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. महाविद्यालयांमध्ये आॅगस्टअखेरपर्यंत निवडणुका पार पडतील, अशी शक्यता आहे.
त्यामुळे कमी कालावधित निवडणुकांची तयारी करण्याचे आव्हान विद्यार्थी तसेच संघटनांसमोर उभे राहिले आहे.
महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थी थेट मतदानाद्वारे करतील. तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड चार महाविद्यालय प्रतिनिधी करतील. ही प्रक्रिया दरवषी कालबध्द पध्दतीने व कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप टाळून राबविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केलेल्या नियमावलीवर कॉँग्रेस, राष्टÑवादीसह अन्य पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका राजकीय अंगाने होत असतील, तर त्यात राजकीय पक्षांचे वावडे कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाच मतांचा : अधिकार
महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्गातील प्रतिनिधी आणि वर्गप्रतिनिधी यासाठी स्वतंत्रपणे मत देण्याचा म्हणजेच एका विद्यार्थ्याला (मतदाराला) एकूण कमाल पाच मते देण्याचा हक्क आहे. महाविद्यालय विद्यार्थी परिषदेची मतमोजणी आणि निकाल मतदानादिवशीच, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी मतदानाच्या तिसºयादिवशी होईल.
उमेदवार महाविद्यालय किंवा विद्यापीठ विभागातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा पूर्णवेळ नियमित विद्यार्थी असावा.
विद्यार्थ्याला मागील अभ्यासक्रमात एटीकेटी नसावी.
उमेदवार असलेला विद्यार्थी एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेला नसावा.
निवडणूक लढविण्यासाठी कमाल वयोमर्यादा २५ असेल. त्यापेक्षा जास्त वय असणारा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरेल.
राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र बंधनकारक असेल. त्याची तपासणी निवडणूक अर्ज भरताना केली जाईल
राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपाबद्दलचा नियम अभाविप या संघटनेला अप्रत्यक्ष मदत होण्यासाठी केलेला आहे. निवडणुका असतील, तर त्याठिकाणी राजकीय पक्षांच्या संघटनांची अॅलर्जी कशासाठी? तरीही आम्ही लोकशाही मार्गाने नियमांचा भंग न करता या निवडणुका लढविण्याची तयारी करीत आहोत.
- शुभम जाधव, शहर जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी विद्यार्थी कॉंग्रेस, सांगली
गेली अनेक वर्षे आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करीत आहोत. कोणत्याही पक्षाशी आम्ही बांधिल नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून आम्ही मंत्र्यांची वाहनेही अडविली आहेत. राजकीय पक्षांचा शिरकाव झाल्यास सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून नियमावली व निवडणूक निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- प्रवीण जाधव, प्रांत सहमंत्री व
महापालिका महानगर मंत्री, अभाविप
आम्ही या निवडणुकांच्या निर्णयाचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांमधून नवीन नेतृत्व तयार व्हावे, त्यांना भविष्यात चांगली राजकीय वाटचाल करता यावी म्हणून या निवडणुका होणे गरजेचे आहे. संघटनेमार्फत आम्ही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
- सचिन सव्वाखंडे, जिल्हाध्यक्ष,
भारतीय विद्यार्थी संसद
निवडणुका कोणत्या पद्धतीने होणार आहेत, याची माहिती अद्याप मिळाली नाही. मागणी करूनही त्याबाबत कोणी सांगण्यास तयार नाही. त्यामुळे निवडणुकांविषयी संभ्रमावस्था आहे. तरीही पक्षीय आदेशाप्रमाणे आम्ही सर्व महाविद्यालयांमध्ये बैठका घेत तयारी सुरू केली आहे.
- स्वप्नील जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेस