बेदाणा व्यापारी संघटनेत प्रथमच निवडणुकीची चिन्हे
By Admin | Published: July 23, 2016 10:57 PM2016-07-23T22:57:28+5:302016-07-23T23:50:26+5:30
नऊ आॅगस्टला मतदान : बिनविरोधसाठीही प्रयत्न सुरूच
सांगली : बेदाणा व्यापाऱ्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्याबरोबरच बेदाणा शेतकऱ्यांनाही योग्य न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सांगली-तासगाव बेदाणा मर्चंटस् असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. सभासदांचे व शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या या संघटनेत पंचवीस वर्षांत प्रथमच निवडणूक होत आहे, हे विशेष. या त्रैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, १३ जागांसाठी ३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
देशात बेदाण्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून सांगली आणि तासगावची ओळख आहे. या दोन्ही ठिकाणी बेदाण्याची मोठी उलाढाल होत असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांनाही अनेक अडचणी येत होत्या. त्यावर उपाय काढण्याच्या दृष्टीने सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनची स्थापना झाली.
या संघटनेमुळे बेदाण्याचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली होती. १६० सभासद असलेल्या या संघटनेत आत्तापर्यंत एकोप्याचे वातावरण होते. मात्र, वर्षाभरापासून मतभेदाचे वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी संचालक मंडळाने सभासदांना विचारात न घेता बॅन कमिटी बरखास्त केल्याने सभासदांत अस्वस्थता होती. त्यामुळेच निवडणूक लागल्याची चर्चा आहे.
संघटनेने आत्तापर्यंत बेदाणा व्हॅटमुक्त करण्यासाठी चांगली भूमिका पार पाडली होती. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट देण्यासाठीही संघटनेचा पुढाकार असल्याने आजपर्यंत कधीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, असे घडले नाही. हे संघटनेचे यशच म्हणावे लागणार आहे.
सध्या दोन पॅनेलची जुळवाजुळव सुरू असली तरी ही व्यापारी संस्था असल्याने निवडणूक न होता बिनविरोधसाठीही प्रयत्न होणार असल्याचे समजते, मात्र इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे निवडणूक अटळ वाटत आहे. गुरुवार, दि. २८ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, ९ आॅगस्टला मतदान व सायंकाळीच निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ व्यापारी जमनादास ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अशी आहे प्रक्रिया
गुरुवार, दि. २८ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतरच खऱ्याअर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ९ आॅगस्टला तासगाव मार्केट कमिटीमध्ये मतदान, तर सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.