‘वसंतदादा’ची निवडणूक २२ मे रोजी
By admin | Published: April 20, 2016 11:52 PM2016-04-20T23:52:26+5:302016-04-20T23:52:26+5:30
कार्यक्रम जाहीर : २३ रोजी निकाल, २१ जागांसाठी लढत
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला. २२ एप्रिलपासून याची प्रक्रिया सुरू होणार असून, २२ मे रोजी मतदान होणार आहे.
संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. कारखाना कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील १६२ गावांमध्ये विखुरलेले आहे. सर्व गावांमधील कारखान्याच्या व्यक्ती उत्पादक सभासदांचा एक मतदारसंघ, याप्रमाणे पाच गट तयार केले आहेत. या पाच गटातून प्रत्येकी तीन, याप्रमाणे १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यानंतर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था मतदार संघ क्र. २ मधून १, अनुसूचित जाती, जमातीतून १, महिला २, इतर मागासवर्गीय १, भटक्या विमुक्त, विशेष मागास प्रवर्गमधून १, असे संचालक निवडून द्यायचे आहेत.
वसंतदादा कारखान्याची सध्याची मतदारसंख्या ३५ हजार २३९ इतकी आहे. सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या चार गटातील सभासदांची संख्या ३५ हजार १00, व्यक्ती सभासद ४२ आणि संस्था सभासद ९७ अशांचा समावेश आहे. २२ एप्रिलपासून वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सहकार विभागाकडून यासाठीची सर्व तयारी झाली आहे.
वसंतदादा कारखान्यावर आजवर वसंतदादा घराण्याचीच सत्ता राहिली आहे. कारखान्याच्या स्थापनेनंतर त्यांचेच एकमुखी वर्चस्व होते. १९८९ पासून या कारखान्याने राजकीय संघर्ष पाहण्यास सुरुवात केली. हिंदकेसरी मारुती माने यांनी रयत पॅनेलच्या माध्यमातून सत्ताधारी गटाबरोबर लढत दिली होती. त्यानंतर बाजीरावआप्पा पाटील यांनीही एकवेळ लढत दिली.
त्यानंतर प्रकाशबापू पाटील आणि विष्णुअण्णा पाटील यांनीही एकमेकांविरोधात पॅनेल लावल्याने दादा घराण्यातच संघर्ष निर्माण झाला होता. निवडणुकीच्या काळातच त्यावेळी विष्णुअण्णा पाटील यांचे निधन झाले होते. वसंतदादा कारखान्याच्या गतवेळच्या निवडणुकीत संघर्ष झाला नाही. यंदा या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे निवडणूक लढविली जाणार, की बिनविरोध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसात याचे चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
असा आहे निवडणूक कार्यक्रम
४उमेदवारी अर्ज दाखल करणे - २२ ते २६ एप्रिल
४दाखल अर्जांची छाननी - २७ एप्रिल
४उमेदवारी अर्ज मागे घेणे - २८ एप्रिल ते १२ मे
४अंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप- १३ मे
४मतदान (आवश्यकता असल्यास)- २२ मे
४मतमोजणी - २३ मे