प्रभाग समिती सभापतींच्या निवडी लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:24 AM2021-04-12T04:24:52+5:302021-04-12T04:24:52+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रभाग समिती सभापतींच्या निवडी होणार की नाही, असा प्रश्न ...
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रभाग समिती सभापतींच्या निवडी होणार की नाही, असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. गतवर्षी कोरोनामुळे सभापतींचा कार्यकाळ वाया गेला होता. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाल्याने इच्छुकांची अपेक्षा फोल ठरणार आहे. शिवाय प्रभाग समितीच्या पुनर्रचनेचा मुद्दाही वादग्रस्त बनला असून, त्यावरही तोडगा निघालेला नाही.
महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. नव्या सभापती निवडीसाठी प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; पण आठ दिवसांत त्यावर निर्णय झालेला नाही. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, महापालिका क्षेत्रात दररोज १०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यांच्या उपचाराची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर आहे. त्यासाठी महापालिकेेचे प्रशासन दिवस-रात्र नियोजनात गुंतले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नियमित कालावधीत सभापती निवडी होण्याची शक्यता धुसर बनली आहे.
त्यात नव्याने सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग समितीवर वर्चस्व राखण्यासाठी त्याची पुनर्रचना केली आहे. त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. नवीन पुनर्रचना नागरिकांच्या गैरसोयीची असल्याचे सांगत त्याला भाजपने विरोध केला आहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. नव्या पुनर्रचनेनुसार काँग्रेस-राष्ट्रवादीला तीन, तर भाजपला एक सभापतीपद मिळू शकते. यापूर्वी नेमकी उलटी स्थिती होती. भाजपकडे तीन प्रभाग समित्या होत्या. त्यामुळे या वादावरही अजून तोडगा निघालेला नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पुनर्रचनेच्या वादात यंदा सभापतीच्या निवडी लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक आहे.