जिल्ह्यातील ७० सोसायट्यांच्या निवडणुका जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:28 AM2021-02-24T04:28:48+5:302021-02-24T04:28:48+5:30
सांगली : जिल्ह्यातील ७० सहकारी सोसायट्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी जाहीर केला. फेब्रुवारी ते ...
सांगली : जिल्ह्यातील ७० सहकारी सोसायट्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी जाहीर केला. फेब्रुवारी ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम चालणार असून त्यानंतर पुढील टप्प्यात जिल्हा बँकेसह मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील निवडणुका जाहीर झालेल्या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक सोसायट्या शिराळा व मिरज तालुक्यातील आहेत. आटपाडी तालुक्यातील ८, खानापूरमधील २, जतमधील ६, कडेगावमधील ८, तासगावमधील २, कवठेमहांकाळमधील ५, वाळवा तालुक्यातील ८, पलूसमधील ७, मिरज तालुक्यातील ११ तर शिराळ्यातील १२ सोसायट्यांचा समावेश आहे. काही सोसायट्यांच्या निवडणुकांसाठी अर्ज विक्री फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर काहींची मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. ३० मार्चपासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होणार आहे. प्रत्येक सोसायट्यांसाठी वेगळा निवडणूक कार्यक्रम दिला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी मतदान व मतमोजणी होणार आहे.
गत ३१ डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार सहा टप्प्यांत घेण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १५२८ संस्थांचा समावेश आहे. पहिला टप्पा आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बहुतांश विकास सोसायट्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह अन्य काही संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल.
राज्यातील जिल्हा बॅँका व विकास सोसायटींची निवडणूक राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलली होती. शासनाने आता पुन्हा त्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्यावर्षी सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे कर्जमाफीशी संबंधित जिल्हा बॅँक व विकास सोसायट्यांच्याच निवडणुका सरकारने लांबणीवर टाकल्या होत्या. ज्या संस्थांचे निवडणूक कार्यक्रम सुरू होते ते त्याच टप्प्यावर थांबविण्यात आले. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेसह जिल्ह्यातील ७४ सहकारी संस्थांचा समावेश होता. त्यामुळे या सर्व संस्था जिल्हा निवडणूक आराखड्यात पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार होत्या. जिल्हा बँकेसाठी संस्था ठरावाची प्रक्रिया सुरू असल्याने आता केवळ ७० सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.