दोन भाऊंसह पडळकर बंधूंची प्रतिष्ठा पणाला-- खानापूर तालुक्यातील निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:56 AM2017-09-05T00:56:26+5:302017-09-05T00:56:31+5:30
विटा : विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाºया खानापूर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून,
दिलीप मोहिते।
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाºया खानापूर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर, कॉँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ. सदाशिवराव पाटील या दोन भाऊंसह गेल्या काही महिन्यांपासून खानापूर तालुक्यात संपर्क वाढविलेले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दरम्यान, आजी-माजी आमदार पुत्रांनीही ग्रामपंचायतीत सत्ता काबीज करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, पडळकर बंधूंच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भाजपने तालुक्यात संपर्क वाढविल्याने यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी रंगत येण्याची शक्यता आहे.
खानापूर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेचे आ. अनिलभाऊ बाबर यांची बहुतांशी ग्रामपंचायतीवर सत्ता आहे, तर माजी आ. सदाशिवराव पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या गटाच्या ताब्यातही काही ग्रामपंचायती आहेत. मात्र, यावेळी आ. बाबर यांचे ग्रामीण भागात असलेले वर्चस्व मोडीत काढण्यासाठी माजी आ. पाटील, राष्टÑवादीचे अॅड. मुळीक, भाजपचे पडळकर बंधू, माजी जि. प. सदस्य सुहासनाना शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील हे एकत्रित येऊन लढा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
तर दुसरीकडे विद्यमान आ. बाबर यांचे सुपुत्र व जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर आणि माजी आ. पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील या दोन पुत्रांनीही ग्रामीण भागात संपर्क वाढवून युवा संघटन मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. महत्त्वाचा समजल्या जाणाºया भाळवणी जि. प. गटासह तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीत माजी आ. पाटील पिता-पुत्रांनी चांगलेच लक्ष घातले आहे. यावेळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत राजकीय पक्षाचे चिन्हा वापरले जाणार नसल्याने काही ग्रामपंचायतीत आघाडीच्या माध्यमातून बंडखोरीही अटळ आहे.
त्याच पध्दतीने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागावर वर्चस्व अबाधित ठेवणारे विद्यमान आ. अनिल बाबर पिता-पुत्रांनीही ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क वाढविला असून, कार्यकर्त्यांना भेटून त्यांना बळ देण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण सरपंच आरक्षण असलेल्या गावांत मोठी चुरस निर्माण होणार असल्याने आजी-माजी आमदारांसह राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. मुळीक, भाजपचे गोपीचंद पडळकर, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी सरपंच पदाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे.
दरम्यान, यावेळी भाजपचे गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर या दोन बंधूंनी खानापूर तालुक्यात विशेष लक्ष घातले आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसह अन्य सामाजिक कामांसाठी त्यांचा तालुक्यात सुरू असलेला संपर्क जनतेत चर्चेचा विषय झाला आहे. तालुक्यतील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या समस्या जाणून घेण्यासाठीही पडळकर बंधूंचा प्रयत्न चालू आहे.
आमदार अनिल बाबर यांचे ग्रामीण भागातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी सर्व गट एकत्रित येण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यावेळी खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका रंगतदार होण्याचे संकेत आहेत.
निवडणुकीच्या रिंगणातील ग्रामपंचायती..
आळसंद, गार्डी, घानवड, घोटी खुर्द, गोरेवाडी, जाधववाडी, जखीनवाडी, जोंधळखिंडी, कार्वे, कुर्ली, मोही, पंचलिंगनगर, वासुंबे, चिंचणी (मं.), ढवळेश्वर, धोंडगेवाडी, धोंडेवाडी, हिंगणगादे, जाधवनगर, माधळमुठी, सांगोले, सुलतानगादे, ऐनवाडी, बामणी, बेणापूर, भूड, चिखलहोळ, घोटी बुद्रुक, हिवरे, कळंबी, मुलाणवाडी, पळशी, वलखड, वाझर, भांबर्डे, वाळूज, बाणूरगड, कमळापूर, लेंगरे, रेवणगाव, ताडाचीवाडी, वेजेगाव, बलवडी (भा.), भाळवणी, करंजे, बलवडी (खा.) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी आजी-माजी आमदारांसह भाजपचे गोपीचंद पडळकर बंधूंनीही मोठी फिल्डिंग लावली आहे.
कॉँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष...
माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. त्यातच कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम व शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे आ. बाबर यांच्या ग्रामीण भागातील वर्चस्वाला सर्व गटातील नेत्यांनी एकत्रित आव्हान दिल्यास आ. कदम यांच्या कॉँग्रेसचे खानापूर तालुकाध्यक्ष रवींद्र (आण्णा) देशमुख यांच्यासह कॉँग्रेसचे तालुक्यातील कार्यकर्ते काय भूमिका घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचे बाबर गटाशी जमत नसल्यामुळे त्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.