मांजर्डे-विसापूर मंडलमध्ये निवडणुकांचे वारे

By admin | Published: July 5, 2016 09:58 PM2016-07-05T21:58:50+5:302016-07-06T00:36:39+5:30

लढती संघर्षमय होणार : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २१ गावांचा समावेश, राजकीय हालचाली

Elections in the Manjarda-Visapur division | मांजर्डे-विसापूर मंडलमध्ये निवडणुकांचे वारे

मांजर्डे-विसापूर मंडलमध्ये निवडणुकांचे वारे

Next

संजयकुमार चव्हाण-- मांजर्डे विसापूर मंडलमधील २१ गावांमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मांजर्डे व विसापूर हे दोन्ही जिल्हा परिषद गट तासगाव तालुक्यातील. परंतु विधानसभेला ते खानापूर मतदारसंघात असल्याने या दोन्ही जिल्हा परिषद गटांना दोन्ही मतदार संघात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये येणारी निवडणूक ही प्रामुख्याने भाजप-राष्ट्रवादी अशीच होईल, अशी सध्या तरी चर्चा आहे. त्याचबरोबर शिवसेना व काँग्रेसचा संघर्ष पाहावयास मिळणार असल्याची चर्चा आहे.
मांजर्डे विसापूर मंडलमध्ये एकूण २१ गावे येतात. या जिल्हा परिषद गटामध्ये तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील काही गावे येतात. हे दोन्ही गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहेत. येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी फौज आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकरदादा पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील, पेडचे पंचायत समिती सदस्य प्रभाकर पाटील, विसापूरचे पंचायत समितीचे माजी सभापती पतंगबापू माने, बोरगावचे निवास पाटील असे मोठे शिलेदार येथे आहेत. परंतु पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आर. आर. पाटील आबांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत खासदार संजयकाका पाटील यांच्या आश्रयास गेले. त्यामुळे राष्ट्रवादी खिळखिळी होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे, पण हे चित्र येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
खासदार पाटील यांना या मतदारसंघात संघर्ष करावा लागेल असे वाटत असले तरी, वायफळेचे सुखदेव पाटील व हातनूरचे विलास पाटील या दोन प्रमुख शिलेदारांना जिल्हा पातळीवरची पदे देऊन खा. पाटील यांनी या भागातील भाजपच्या गोटात चैतन्य निर्माण केले. मांजर्डेचे सचिन पाटील हे युवा नेतृत्व या भागातून तयार होत आहे. त्यांनी मांजर्डे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा संघर्ष करावयास लावला होता. या भागातील आणखी बऱ्याच तरुण मंडळींनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्षाचे संघटन मजबूत करण्यात खा. पाटील यशस्वी झाले आहेत.
खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने आमदारकी मिळाली, पण या भागातील पक्ष संघटन शिवसेना तितकेसे बळकट करणे अजून त्यांंना जमलेले नाही. कार्यकर्त्यांचा अभाव दिसून येतो, परंतु काही राष्ट्रवादीची मंडळी त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचाही विधानसभा निवडणुकीनंतर जनसंपर्क कमी झाला आहे. त्यांचीही कार्यकर्त्यांची फळी कमकुवत झाली आहे.
सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघाची पुनर्रचना होणार असून, काही गावांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण कोणते येईल, याकडेही लक्ष आहे, त्यानुसार पुढील रणनीती ठरणार आहे. खुल्या गटातील आरक्षण येईल, अशी या भागातील उत्साही नेत्यांना आशा आहे. जर आले तर बरीच नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या निवडणुकीकडे आता लक्ष लागून राहिले आहे.


स्वबळाची भाषा : चर्चेअंतीच निर्णय
आमदार जयंत पाटील व आमदार सुमनताई पाटील यांनीही १५ दिवसांपूर्वी या दोन्ही गटांमध्ये निवडणूक पूर्व आढावा बैठक घेतल्या आहेत. आमदार अनिल बाबर यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुका आम्ही स्वबळावरच लढविणार आहोत. जर वरिष्ठ पातळीवरून भाजप व शिवसेना युती झाली, तर त्याप्रमाणे आम्ही रणनीती ठरवणार. माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले की, आम्ही जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढविणार आहोत. जर आघाडी झाली तर स्वागतच आहे. आमचे पक्ष संघटन मजबूत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी, चर्चा सुरू आहेत.

Web Title: Elections in the Manjarda-Visapur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.