सांगली जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर, प्रशासकांची नियुक्ती होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:25 PM2022-09-30T13:25:42+5:302022-09-30T13:26:10+5:30
ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक
सांगली : नोव्हेंबर २०२२ मध्ये ३८७ आणि डिसेंबर २०२२ मध्ये ६५ अशा जिल्ह्यांतील ४५२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तीन महिन्यांत होणार नसल्यामुळे येथे प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात म्हटले की, कोविड-१९ आजाराबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेतल्या आहेत. राज्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सांगली जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याची गरज होती.
परंतु, ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणेकरिता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर केले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपतील. त्यानुसार तिथे तत्काळ प्रशासकांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आदेशाद्वारे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.
या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे जाणार
तालुका -ग्रामपंचात संख्या
खानापूर ४५
मिरज ३८
जत ८१
कडेगाव ४३
वाळवा ८८
आटपाडी २६
क.महांकाळ २९
पलूस १६
शिराळा ६०
तासगाव २७