सांगलीतील कुंडल, हरिपूरसह पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 12:34 PM2022-11-12T12:34:13+5:302022-11-12T12:34:40+5:30
या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
सांगली : पलूस तालुक्यातील कुंडल, मिरज तालुक्यातील नांद्रे, हरिपूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव आणि आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या ग्रामपंचायतीच्या प्रभागाचे आरक्षण सोडत काढताना ओबीसी आरक्षण टाकले नव्हते. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमातून पाच ग्रामपंचायती वगळल्या आहेत. तसेच या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
नांद्रे, हरिपूर, कुंडल, मळणगाव, चिंचाळे या ग्रामपंचायतींचे नव्याने प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पण, अधिकाऱ्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण शून्य असल्याने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द केलेची जाहीर नोटीस रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे, पण असे असूनही हरिपूरकरिता ओबीसी आरक्षण शून्य कसे आले, याबाबत संदिग्धता होती.
याविरोधात पाच ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधींची ओबीसी आरक्षणानुसारच सोडत निघाली पाहिजे. यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी कुंडल, हरिपूरसह पाचही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तसेच ओबीसीनुसार निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा दि. १५ नोव्हेंबर रोजी बोलविण्यात येणार आहे. या सभेत प्रारूप प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत दि. १७ नोव्हेंबर, दि. १८ नोव्हेंबर सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, दि. १८ ते २२ नोव्हेंबर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे, दि. २३ नोव्हेंबर उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, दि. २४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देऊन दि. २५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे