मुदत संपलेल्या ४५२ ग्रामपंचायतींचे सदस्य बाजार समितीसाठी अपात्र?, सांगलीतील सात समित्यांच्या निवडणुका पुढे जाण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 04:03 PM2022-11-23T16:03:41+5:302022-11-23T16:04:28+5:30

ग्रामपंचायत गटातील संचालक निवडींचा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.

Elections of seven committees in Sangli are signs of going ahead, Ambiguity about eligibility of voters in gram panchayat groups | मुदत संपलेल्या ४५२ ग्रामपंचायतींचे सदस्य बाजार समितीसाठी अपात्र?, सांगलीतील सात समित्यांच्या निवडणुका पुढे जाण्याची चिन्हे

मुदत संपलेल्या ४५२ ग्रामपंचायतींचे सदस्य बाजार समितीसाठी अपात्र?, सांगलीतील सात समित्यांच्या निवडणुका पुढे जाण्याची चिन्हे

Next

संतोष भिसे

सांगली : जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी ग्रामपंचायत गटांतील मतदारांच्या पात्रतेविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुका पुन्हा पुढे ढकलली जाण्याची चिन्हे आहेत.

सांगली, इस्लामपूर, शिराळा, तासगाव, पलूस, विटा, आटपाडी बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर झाली आहे. सध्या हरकतींची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान, ग्रामपंचायत गटातील संचालक निवडींचा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत.

नव्या सदस्यांचे राजपत्र दि. २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. बाजार समित्यांच्या मतदार यादीत बरखास्त झालेल्या ग्रामपंचायतींतील जुन्या सदस्यांची मतदार म्हणून नावे आहेत. ते विद्यमान सदस्य नसल्याने मतदानास अपात्र आहेत. त्यामुळे समित्यांची सध्याची मतदार यादी रद्द करून दि. २३ डिसेंबरनंतर नव्याने करावी लागेल. या स्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. प्रशासकीय कालावधी वाढू शकतो. प्रशासकराज सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ठेवता येत नसल्याने हादेखील नवाच गुंता होणार आहे.

संचालकपदी निवडीनंतर लगेच अपात्र

सध्याच्या मतदार यादीतील एखादा ग्रामपंचायत सदस्य समितीमध्ये निवडणूक लढवून संचालकपदी निवडून आला, तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नसल्याने संचालक म्हणून तात्काळ अपात्र ठरेल. तेथे पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागेल. हीदेखील समस्या सहकार खात्यापुढे आहे.

साडेचारशेहून अधिक ग्रामपंचायती बरखास्त झाल्याने तेथील सदस्य बाजार समितीसाठी मतदार म्हणून अपात्र ठरले आहेत. दि. २३ डिसेंबरला ग्रामपंचायतीत नवे सदस्य सत्तारुढ झाल्यानंतर त्यांच्या नावांसह नव्याने मतदार यादी बनविण्याची आमची मागणी आहे. तशी हरकत दाखल केली आहे. - दादासाहेब कोळेकर, हरकतदार व माजी संचालक, बाजार समिती
 

बरखास्त ग्रामपंचायतींच्या सदस्यांना बाजार समितीसाठी मतदार म्हणून घेणार असाल, तर विकास सोसायट्यांसाठीही हाच निकष लावण्याची आमची मागणी आहे. सोसायट्यांमधील जुन्या संचालकांना मतदार व उमेदवार म्हणून पात्र ठरवावे. सध्याच्या मतदार यादीविरोधात हरकत दाखल केली असून, प्रसंगी न्यायालयात जाणार आहोत. - साहेबराव टोणे, हरकतदार व माजी पंचायत समिती सदस्य, जत

बरखास्त ग्रामपंचायतींच्या सदस्यांना बाजार समित्यांसाठी मतदार म्हणून कायम ठेवण्याविषयी शासनाकडून निश्चित मार्गदर्शिका नाहीत. हरकतींवर दि. २९ नोव्हेंबरला सुनावणी घेणार आहोत. प्रसंगी नवी मतदार यादीसुद्धा तयार करावी लागेल. ग्रामपंचायतीत कार्यरत नसलेला सदस्य समितीत संचालक म्हणून निवडून आल्यास त्याला अपात्र ठरवावे लागते. यावरही विचार करावा लागणार आहे. - मंगेश सुरवसे, प्रशासक तथा निवडणूक अधिकारी, सांगली बाजार समिती

Web Title: Elections of seven committees in Sangli are signs of going ahead, Ambiguity about eligibility of voters in gram panchayat groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.