सांगली जिल्हा बँकेच्या निवडी; काँग्रेसचे सर्वाधिकार विश्वजित कदमांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 11:42 AM2021-12-04T11:42:52+5:302021-12-04T11:43:35+5:30
जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९ संचालक असून, अध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे.
सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष निवडीबाबत काँग्रेसचे सर्वाधिकार सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. उपाध्यक्ष पदासाठी जयश्रीताई मदन पाटील यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे. मात्र, डॉ. कदम काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने २१पैकी १७ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली. विरोधी भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलने चार जागी विजय मिळवत स्थान घट्ट केले आहे. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९, काँग्रेसचे ४ तर शिवसेनेचे ३ संचालक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९ संचालक असून, अध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे.
उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार आहे. या जागेचा उमेदवार ठरविण्याचे अधिकारी डॉ. कदम यांना दिले आहेत. उपाध्यक्षपदी जयश्रीताई मदन पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे. अचानक विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड यांचीही नाव उपाध्यक्ष पदासाठी पुढे येऊ शकतात.