आटपाडीकरांच्या पाण्याला विजेचा झटका

By admin | Published: October 11, 2015 11:19 PM2015-10-11T23:19:23+5:302015-10-12T00:37:29+5:30

आठ ते दहा दिवसात एकदा पाणी : वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा नखरा, कारभाऱ्यांच्या झेडपीत चकरा आणि पुढाऱ्यांची ‘शांताबाई...!’

Electric shock of atpadikar water | आटपाडीकरांच्या पाण्याला विजेचा झटका

आटपाडीकरांच्या पाण्याला विजेचा झटका

Next

अविनाश बाड -- आटपाडी--गणेशोत्सवात ‘शांताबाई...’ या गाण्यानं धुमाकूळ घातला. शहरातून अल्पावधितच या गाण्याची लाट अगदी खेड्यापाड्यात पोहोचली. पण गणेशोत्सवाच्या आधीपासूनच तब्बल १६ कोटी रुपये खर्चून आटपाडीकरांसाठी केलेल्या पाणी पुरवठा योजनेला गेल्या सव्वा महिन्यात केवळ वीज कनेक्शन न दिल्याने, आटपाडीकरांना ८ ते १० दिवसांतून एकदा मिळणारे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. तरुणाईला झिंग आणणाऱ्या ‘शांताबाई...’च्या भाषेत इथे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा नखरा, जिल्हा परिषदेत कारभारी मारिती चकरा आणि पुढाऱ्यांची शांताबाई...! अशी स्थिती झाली आहे.
आटपाडी म्हणजे पाण्याचा कालवा असणारच, हे जरी खरं आणि तितकंच बरोबर असलं तरी, आटपाडीत आता टेंभू योजनेचे पाणी आले आहे. आटपाडी तलावात पिण्यासाठी या योजनेचे पाणी सोडून तलाव पिण्यासाठी आरक्षित केल्याने, पिण्यापुरते पाणी आता कायमस्वरुपी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण या तलावाखाली विहिरी काढून (ज्या विहिरींना पाणी नसते) त्यातून गावाला सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. विहिरीत पाणी नाही म्हणून तलावात मोटारी टाकून किंवा कालव्यातून थेट पाणी घेऊन ‘टेंभू’चे आणि पावसाने ढवळलेले, गेले वर्षभर साचलेले गढूळ पाणी सध्या ८ ते १० दिवसांतून एकदा गावाला पिण्यासाठी पुरवठा केले जात आहे.
गावाची जुनी पाणी पुरवठा योजना कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे सतत घोटाळा सुरू असतो. यावर मात करण्यासाठी २००७ मध्ये आटपाडीसाठी १६ कोटी ६ लाख रुपये खर्चाची जलशुद्धीकरण प्रकल्प असलेली योजना करण्यात आली. गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण होऊनही गावाचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत.
या योजनेच्या तलावातील विहिरीसह जॅकवेल व त्यातील ४० अश्वशक्तीचे दोन पंप आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३५ अश्वशक्तीचे दोन पंप बसवून ३ महिने झाले. तिथे दोन ९० आणि ५१ अश्वशक्तीचा वीज पुरवठा करण्यासाठी दोन डीपी बसवून सव्वा महिना झाला. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या योजनेच्या ९७ लाख रुपये थकबाकीचे कारण पुढे करून नव्या योजनेला वीज कनेक्शन देण्यास नकार दिला आहे.
वीज कंपनीचे देणे अंशत: देण्यासाठी आणि वीज बिलाचा दंड, व्याज ही रक्कम कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत कारभाऱ्यांचे म्हणणे आहे. ते प्रयत्न करतील तेव्हा करतील आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येईल तेव्हा येईल; पण आता सध्या ८ ते १० दिवसांतून एकदा मिळणाऱ्या गढूळ पाण्याने ग्रामस्थांचे जे हाल सुरू आहेत, याला जबाबदार कोण? ग्रामपंचायत प्रशासन की वीज मंडळाचे अधिकारी? आज ना उद्या वीज कंपनीला ग्रामपंचायतीला देणे बाकी द्यावीच लागणार आहे, पण सध्या या मंडळींनी ४० हजार नागरिकांना वेठीस धरले आहे.
आ. अनिल बाबर यांनी वीज बिलाची दंडासह अतिरिक्त असलेली रक्कम कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत ऊर्जामंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याची ग्वाही दिली आहे. बाबर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह सांगली जिल्हा परिषदेत जाऊन पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने गावाला पाणीपुरवठा होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांची बैठकही आयोजित केली होती.
माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि समाजकल्याण सभापती उज्ज्वला लांडगे यांनी साडेसात लाख रुपये निधी त्यांच्या स्विय निधीतून देण्यासाठी जिल्हा परिषदेला पत्र देऊन २० दिवस झाले. या निधीची फाईल जिल्हा परिषदेच्या लालफितीत अडकली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कलावंतानं शांताबाई गाण्याची निर्मिती केली. शांत राहणाऱ्या पुढाऱ्यांमुळे इथे पिण्याच्या पाण्याला लोक महाग झाले आहेत.


टक्केवारीचा जलवा : फाईल कुणी हलवा..!
एरवी जिल्हा परिषदेत जाऊन अनेक ठेकेदार दिवसात आणि तासात धनादेश काढतात; पण आटपाडी या तालुक्याच्या गावचा पाणीप्रश्न एवढा गंभीर बनला असताना आटपाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेले २० दिवस जिल्हा परिषदेत दररोज हेलपाटे मारत आहेत. दररोज उद्या नक्की धनादेश मिळेल, या आशेने ते चकरा मारीत आहेत.




वीज कनेक्शनअभावी आटपाडीकरांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. गाव सोशिक आहे. त्यामुळे कोणी इथे उठाव करीत नाही. याला जबाबदार कोण; याचा विचार होणे गरजेचे आहे. नाही तर आटपाडीचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.
- व्ही. एन. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, आटपाडी.



ऐका दाजीबा...
वीज वितरण कंपनीच्या वसुलीबहादर अधिकाऱ्यांनी आता प्रत्यक्ष साडेसात लाख रुपये रक्कम भरल्याशिवाय वीज कनेक्शन न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. अर्थात एवढी थकबाकी का वाढली, हा वेगळा मुद्दा असला तरी, आटपाडीकरांचा पाण्यासाठी नुसताच कालवा सुरू असून, पुढाऱ्यांनी का कुणास ठाऊक शांत राहण्याची भूमिका घेतली आहे.

Web Title: Electric shock of atpadikar water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.