वीज बिलप्रश्नी लाडेगावात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:46+5:302021-03-09T04:30:46+5:30
गाव बंदच्या माध्यमातून लाडेगावने महावितरणविरुद्ध असंतोष व्यक्त केला. दिवसभर अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व गाव शंभर टक्के बंद होते. ...
गाव बंदच्या माध्यमातून लाडेगावने महावितरणविरुद्ध असंतोष व्यक्त केला. दिवसभर अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व गाव शंभर टक्के बंद होते. गेल्या काही दिवसांपासून महावितरणने बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडू, अशी भूमिका घेतल्याने ग्रामीण भागात महावितरणविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच काही लोकांचे कनेक्शन महावितरणकडून तोडले गेले, आता सरकारने जाहीर केले आहे की जोपर्यंत बिलासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत कोणाचेही कनेक्शन तोडू नका. तरीही महावितरणकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वारंवार फोन करून बिल भराच, असे बजावले जात आहे. त्यामुळे लाडेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत सरकारने दिलेला शब्द पाळावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा व वीज बिलात सूट द्यावी, या मागणीसाठी लाडेगावतील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
काेट
कोरोना काळात सर्वसामान्यांना वीज बिल मोठ्या प्रमाणात आले. सर्वत्र बंद असल्याने ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे सामान्यांना बिल भरणे शक्य नाही, त्यामुळे घरगुती बिलात पन्नास टक्के व शेतीच्या बिलात शंभर टक्के सवलत मिळावी.
- रणधीर पाटील,
सरपंच, लाडेगाव