वीज बिल घोटाळा; मनपाची पुन्हा पोलिसात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:29+5:302021-06-21T04:19:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वीजबिल घोटाळाप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून लवकरच पुरवणी फिर्याद दाखल केली जाणार आहे. महावितरणकडून देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वीजबिल घोटाळाप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून लवकरच पुरवणी फिर्याद दाखल केली जाणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या बिले आणि ऑनलाइन बिलात घोळ समोर आला आहे. याच्या चौकशीसाठी पुन्हा पोलिसांत धाव घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या वीजबिलात साडे पाच कोटीचा घोटाळा उघडकीस आला आहे. २०१५ पासून हा घोटाळा सुरू होता. याप्रकरणी महापालिकेच्या वतीने पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महावितरण कंपनीने या घोटाळ्यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. महावितरणकडून सही शिक्क्यानिशी आलेल्या बिलात महापालिकेची कुठेच थकबाकी दिसून येत नाही. तर स्थिर आकारात वाढ केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, असे पत्र आयुक्त नितीन कापडणीस यांनी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांना दिले होते. आता महापालिकेकडून पुरवणी फिर्याद दिली जाणार आहे. यात महापालिकेला सही शिक्क्यानिशी दिलेल्या बिलांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.
याबाबत आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिकेने दिलेले धनादेश, महावितरण कंपनीचे बिले याचे विशेष लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाला पत्र लिहिले आहे. शासनाकडूनच लेखापरीक्षक नियुक्त व्हावा, यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी लवकरच मुंबईलाही जाऊन सचिवांची भेट घेणार आहोत.