पथदिव्यांचे वीजबिले शासनाने भरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:21+5:302021-07-17T04:22:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची वीजबिले महाराष्ट्र शासनानेच भरावीत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची वीजबिले महाराष्ट्र शासनानेच भरावीत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद शिराळा तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सांगली जिल्हा सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष विजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सरपंचांनी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच गावातील पथदिव्यांची बिले शासन भरत आहे. कोरोनाच्या बिकट स्थितीत ही बिले ग्रामपंचायतीने भरावे, असे आदेश शासनाने काढले आहेत. वास्तविक या काळात वसुली नसल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली आहे. वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार पायाभूत सुविधांसाठी देत आहे. त्यावर डोळा ठेवून पथदिव्यांची वीज बिले भरावयास लावणे म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसविणे असे आहे. अशा काळात शासन ग्रामपंचायतींना वाऱ्यावर सोडून देत आहे. ही बाब खेदजनक आहे. तालुक्यातील एकही ग्रामपंचायत पथदिवे वीजबिल व पाणीपुरवठा वीजबिल ग्रामनिधी अथवा १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरणार नाही. शासनाने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर विजय महाडिक, विनोद पन्हाळकर, विजय पाटील, पांडुरंग कुसळे, मनीषा कुंभार, विश्वास पाटील, शशिकांत पाटील, राकेश सुतार, रामचंद्र पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.