सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहक झाला हायटेक, महिन्यात १०८ कोटीचे वीजबिल भरले ऑनलाइन
By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2023 17:10 IST2023-07-08T17:10:32+5:302023-07-08T17:10:49+5:30
‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क

सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहक झाला हायटेक, महिन्यात १०८ कोटीचे वीजबिल भरले ऑनलाइन
सांगली : जिल्ह्यातील सर्व प्रकाराच्या दोन लाख चार हजार वीज ग्राहकांनी जून २०२३ या महिन्यात १०८ कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे. ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी प्रोत्साहन दिले जात आहे, याचाच फायदा महावितरण कंपनी आणि वीज ग्राहकांना होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील ६५ टक्के वीज देयकांची रक्कम ग्राहकांकडून ऑनलाइनद्वारे भरणा केली जात आहे.
जून २०२३ या महिन्यात सर्व प्रकाराच्या दोन लाख चार हजार वीज ग्राहकांनी चक्क १०८ कोटी रुपये ऑनलाइन भरले आहेत. तसेच दोन लाख ६० हजार ग्राहकांनी ४६ कोटी ११ लाख रुपये ऑफलाइन भरले आहेत. मे २०२३ या महिन्यात दोन लाख आठ हजार वीज ग्राहकांनी १०० कोटी रुपये भरणा केला आहे. तसेच दोन लाख ३० हजार ग्राहकांनी ३३ कोटी रुपये ऑफलाइन भरले आहेत.
एप्रिल २०२३ या महिन्यात एक लाख ६८ हजार वीज ग्राहकांनी ८० कोटी ४६ लाख रुपये ऑनलाइन भरले असून एक लाख ५७ हजार ग्राहकांनी १८ कोटी चार लाख रुपये ऑफलाइन भरले आहेत. ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे पैसे तात्काळ भरल्यास१ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे.
वीज ग्राहकांनी या सेवेचा केला वापर
नेटबँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्डसह मोबाइल वॉलेट व कॅश कार्ड्सचा उपयोग करून वीजबिलाचा ऑनलाइन भरणा केला आहे. हेच पर्याय वापरून महावितरणच्या मोबाइल ॲपवरून काही ग्राहकांनी वीजबिल भरणा केला आहे. भीम ॲप किंवा इतर कोणत्याही पेमेंट वॅलेटच्या माध्यमातून वीजबिलाचा भरणा करणे सुलभ व सुरक्षित आहे. ऑनलाइन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वेळ व पैशांच्या बचतीची सुविधा महावितरणने दिली आहे.