पूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, मोटारी घरात, बिले दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 02:44 PM2019-12-04T14:44:03+5:302019-12-04T14:48:11+5:30
महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक बसला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून पाण्याच्या मोटारी घरात ठेवल्या असताना अचानक महावितरण कंपनीने सहा महिन्यांची दोन हप्त्यातील सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांची बिले शेतकऱ्यांना धाडली आहेत. मोटारी घरात असताना वीजबिले दारात आल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.
सांगली : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक बसला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून पाण्याच्या मोटारी घरात ठेवल्या असताना अचानक महावितरण कंपनीने सहा महिन्यांची दोन हप्त्यातील सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांची बिले शेतकऱ्यांना धाडली आहेत. मोटारी घरात असताना वीजबिले दारात आल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.
समडोळी येथील शेतकरी सूर्यकांत बाळासाहेब मगदुम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महापुराच्या काळात विजेच्या मिटरबाबत महावितरणनेच निर्णय घ्यायला हवा होता. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगत शेतीतील पाण्याच्या मोटारी घरात नेऊन सुरक्षित ठेवल्या. जूनपासून या मोटारी अद्यापही घरातच आहेत. दुसरीकडे महापुराच्या काळात दोन महिने व त्यानंतरही अवकाळी पावसामुळे दोन महिने शेतीची कामेच करता आली नाहीत.
वीजेचा वापरही केला गेला नाही. सहा महिने शेतकऱ्यांना शेतीपासून दूर रहावे लागले असताना अचानक आलेल्या या भरमसाठ बिलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. महावितरणने बंद असलेल्या मीटरचे कसे रिडिंग घेतले आणि बिलाची कशी आकारणी केली, हा संशोधनाचा विषय आहे.
समडोळी येथील सुभाष बापुसो खोत, सुधीर बापुसो खोत, रवींद्र पाटील आदी शेतकऱ्यांनाही अशी भरमसाठ बिले आली आहेत. अगोदरच वीजेच्या दराने हैराण असलेल्या शेतकऱ्यांचे वापराविना आलेल्या बिलामुळे कंबरडे मोडले आहे. महावितरण कंपनीने या विजबिलांबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मगदुम यांनी दिला आहे.