सांगली जिल्ह्यातील ८३ हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित होणार, महावितरणकडून कारवाई सुरू
By अशोक डोंबाळे | Published: February 4, 2023 06:55 PM2023-02-04T18:55:36+5:302023-02-04T18:56:15+5:30
ऐन उन्हात पिके कोमेजली
अशोक डोंबाळे
सांगली : पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीत जिल्ह्यातील ८२ हजार ७५२ कृषी पंप ग्राहकांकडे २१३ कोटी ३९ लाख तीन हजार रुपये थकबाकी आहे. या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली असून, थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार कृषी ग्राहकांकडे १०१६ कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच चालू वीज बिलांचे ५५५ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी पाच ते दहा वर्षे थकबाकी कृषी ग्राहकांची संख्या ६२ हजार २०४ असून, त्यांच्याकडे १५६ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपये आहेत. तसेच १७ हजार ४०२ कृषी ग्राहक १० ते १५ वर्षांपासून थकबाकीदार आहेत.
या ग्राहकांकडे ४७ कोटी ४८ लाख सात हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत थकबाकीदार कृषी ग्राहकांची तीन हजार १४६ ग्राहक असून, त्यांच्याकडे नऊ कोटी ३५ लाख १५ हजार रुपयांची थकबाकी आहे. या कृषी ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अकडे टाकणाऱ्यांचे जागेवर नियमित कनेक्शन
ग्रामीण भागातील शेतकरी वीज कनेक्शनसाठी अर्ज करून थकल्यानंतरही महावितरणकडून विद्युत कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जवळच्या विद्युत तारेवर अकडे टाकून कृषी पंप चालू केले होते. या कृषी ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला असून, जागेवरच त्यांना विद्युत कनेक्शन देण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे.
पाच वर्षांवरील थकीत कृषी ग्राहक
विभाग - ग्राहक संख्या - थकीत रक्कम
इस्लामपूर - १०२०४ - १८.२७ कोटी
क.महांकाळ - २८३६३ - ८४.४८ कोटी
सांगली ग्रामीण - १७७३६ - ३९.२४ कोटी
सांगली शहरी - ४५३ - १.१२ कोटी
विटा - २५९९६ - ७०.२५ कोटी
एकूण - ८२७५२ - २१३.३९ कोटी
ऐन उन्हात पिके कोमेजली
ऐन उन्हाळ्यात महावितरण कंपनीने थकबाकीदार कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. याचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी मधुकर जाधव यांनी दिली.