कुंभमेळ्याला चाललेली हत्तीण वनविभागाने मिरजेत अडविली
By admin | Published: December 4, 2014 11:08 PM2014-12-04T23:08:37+5:302014-12-04T23:37:59+5:30
तक्रारीनंतर कारवाई : प्रवासाचा परवाना नाही
मिरज : नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी नेण्यात येणारी हत्तीण मिरजेत वनविभागाने ताब्यात घेतली. पायी चालवत नेण्यात येत असल्याने व प्रवासाचा परवाना नसल्याने हत्तीणीला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कुपवाड येथील कार्यालयात ठेवण्यात आले आहे.
अळणापूर संस्थान, करमाळा येथील हत्तीण नाशिक येथे महाकुंभमेळ्यासाठी नेण्यात येत होती. मोहन शेगर, मोहन चौगुले, आदिनाथ शिंदे, सुभाष शेगर, जयप्रकाश शेगर, बाबाजी शेगर, माहूत प्रकाश नाईक, पेरूलाल नाईक (रा. करमाळा) हे हत्तीणीला पायी चालवत मिरजेतून सांगलीला नेत होते.
पीपल्स फॉर अॅनिमलचे अशोक लकडे यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर वन अधिकारी एस. के. वाघमारे यांनी कृपामयी हॉस्पिटलजवळ हत्तीणीला ताब्यात घेतले. हत्तीणीचा प्रवास परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र माहुताकडे नव्हते. लांबच्या प्रवासाला नेताना हत्तीला ट्रकमधून नेणे आवश्यक असल्याच्या कारणावरून सुमारे दोन वर्षे वयाच्या पाळीव हत्तीणीला ताब्यात घेऊन कुपवाड येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. (वार्ताहर)
कागदपत्रे दिल्याशिवाय ताबा देणार नाही
दोन महिन्यांपूर्वी करमाळा येथून प्रवासाला निघालेली हत्तीण कर्नाटकातील मंजुस्थान धर्मस्थळ येथून कोल्हापुरात आली. तेथून मिरज, सांगली या मार्गाने शिर्डीला नेऊन नाशिक येथे महाकुंभ मेळ्यासाठी नेत असल्याचे माहुतांनी सांगितले. हत्तीच्या प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने हत्ती वनविभागाने ताब्यात घेतला आहे. संबंधित माहुतास कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. कागदपत्रे मिळेपर्यंत ही हत्तीण वनविभागाचा पाहुणचार घेणार आहे.