सांगली जिल्ह्यातील अकरा प्राथमिक शाळा शिक्षकांविनाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:32 PM2018-07-09T23:32:04+5:302018-07-09T23:39:11+5:30
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी, शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटलेला नाही.
सांगली : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी, शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटलेला नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, जिल्हा परिषदेच्या ११ शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाने अन्य शाळांतील शिक्षकांची तात्पुरती सोय केली असली तरी, त्याचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे.
यंदा जिल्ह्यातील २ हजार १६५ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्याची प्रक्रिया झाली. हे करत असताना सर्व तालुक्यात समान रिक्त पदे ठेवण्यासह अतिरिक्त शिक्षकांच्या शाळेचाही विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा आढावा घेतला, तर १ हजार ६९८ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांसाठी ६ हजार ४३१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी ५ हजार ८०६ शिक्षक कार्यरत आहेत. ७६० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांपैकी सर्वाधिक ३५० शिक्षकांच्या जागा फक्त जत तालुक्यातच रिक्त आहेत. यासह आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील पदेही रिक्त आहेत. ग्रामविकास विभागाने बदली प्रक्रिया राबविताना दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही याच भागातील अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडल्या आहेत.
शिक्षकांसाठी पाठपुरावा
जिल्हा परिषदेच्यावतीने रिक्त जागांवर शिक्षक मिळावेत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आॅनलाईन बदली प्रक्रियेतून शिक्षक मिळण्याची व दुर्गम भागातील शाळांची सोय होईल, ही अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरल्याने आता उर्वरित जागांसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षक नसलेल्या ठिकाणी शेजारच्या शाळेतील शिक्षकांना काही काळासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शून्यशिक्षकी शाळा...
जिल्ह्यातील शिक्षकच नसलेल्या अकरा शाळांमध्ये देशमुखवाडी (आटपाडी), जत तालुक्यातील बनाळी, जाडरबोबलाद, मुचंडी, उमदी, वाळकेवाडी, वळसंग, विहापूर (ता. कडेगाव), आरळा (ता. शिराळा), कोरेगाव (ता. वाळवा) या गावांतील शाळांचा समावेश आहे.