‘टेंभू’च्या पाण्यासाठी कडेगावात एल्गार
By admin | Published: April 29, 2017 12:14 AM2017-04-29T00:14:35+5:302017-04-29T00:14:35+5:30
‘टेंभू’च्या पाण्यासाठी कडेगावात एल्गार
कडेगाव : टेंभू योजनेचे पाणी शिवाजीनगर तलावातून कालव्याद्वारे सोडावे, तसेच कडेगाव तलावात पुरेसा पाणीसाठा करावा, सुर्ली कालव्यातून शेतीसाठी पुरेसे पाणी द्यावे, या मागणीसाठी धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कडेगाव बस स्थानकाजवळ विजापूर-गुहागर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीनगर तलावातून पाणी सोडल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
टेंभू योजनेचा राखीव साठा असलेल्या शिवाजीनगर तलावाखालील शेतीपिके पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. शिवाजीनगर तलाव टेंभूच्या पाण्याने तुडुंब भरलेला आहे. योजनेचे आवर्तनही सुरु आहे. यामुळे उपसा होईल तितके पाणी तलावात घेता येत आहे. आम्ही पाणीपट्टी भरतोय, तरीही या तलावातून पाणी का सोडत नाही? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला. यावर तातडीने निर्णय घेत सहाय्यक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांनी शिवाजीनगर तलावातून पाणी सोडले.
कडेगाव शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. कडेगाव शहराची पाणीपुरवठा विहीर या तलावालगत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी या तलावात टेंभू योजनेचे पाणी सुर्ली कालव्याद्वारे सोडले आहे. परंतु सुर्ली कालव्याच्या मागील बाजूस शेतकरी पाणी उपसा करतात, त्यामुळे तलावात पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही. हे पाणी ३० एप्रिल रोजी बंद होणार आहे. त्यामुळे कडेगाव शहराचा पाणीप्रश्न सुटणार नाही. यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पाणी सुरु ठेवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावर नरेंद्र घार्गे यांनी, कडेगाव तलावात चार दिवस जादा पाणी सोडणार असल्याचे सांगितले. याशिवाय ९ व ११ व्या किलोमीटरवरच्या वितरिकेतून शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचे आश्वासन घार्गे यांनी दिले.
यावेळी चंद्रसेन देशमुख, युवा नेते धनंजय देशमुख, नगरसेवक उदय देशमुख, नितीन शिंदे, विजय गायकवाड, संतोष डांगे, महावीर माळी, रघुनाथ गायकवाड, मानसिंग देशमुख, विवेक भस्मे, युन्नूस पटेल, सुनील गाढवे, संजय तडसरे, राजेंद्र राऊत, राजेंद्र शिंदे, शिवाजी चन्ने, सुरेश शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)
टेंभूचा राखीव साठा करा
कडेगाव तलाव टेंभू योजनेच्या रिझर्व्ह क्षेत्रात येत नाही. त्यामुळे कडेगाव शहर व परिसरात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या राखीव क्षेत्रात समावेश करावा आणि हा तलाव टेंभू योजनेचा राखीव साठा म्हणून वापरात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख यांनी केली. या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांनी सांगितले.