सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले
By संतोष भिसे | Published: September 17, 2023 12:06 PM2023-09-17T12:06:03+5:302023-09-17T12:33:06+5:30
विश्रामबागमधून मोर्चा सुरु झाला, पण राम मंदिर चौकात त्यापूर्वीच आंदोलनाचा रंग गडद झाला होता.
सांगली : भगव्या टोप्या आणि भगव्या झेंड्यानी भरून गेलेल्या सांगलीतील राम मंदिर चौकातील वातावरणाने मराठा मोर्चामध्ये चांगलेच रंग भरले. आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी सांगलीत आयोजित मोर्चाने 2016 च्या वादळाची पुन्हा आठवण करून दिली.
विश्रामबागमधून मोर्चा सुरु झाला, पण राम मंदिर चौकात त्यापूर्वीच आंदोलनाचा रंग गडद झाला होता. सांगलीच्या पश्चिमेकडील गावातून येणारे मराठा बांधव विश्रामबागकडे जाण्यापूर्वी चौकात थांबत होते. भगवे झेंडे फडकवत 'आरक्षण आमच्या हक्काचं ' अशा घोषणांनी चौक दणाणून सोडत होते. यामध्ये महिलांची संख्याही मोठी होती. बुधगांव, कवलापूर, डिग्रज, पलूस, तासगाव आदी गावातून मोर्चेकऱ्यांचे थवे येत होते. राम मंदिर चौकात पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटाचे पुढे देऊन त्यांचा श्रमपरिहार केला जात होता.
सांगली : भगव्या टोप्या आणि भगव्या झेंड्यानी भरून गेलेल्या सांगलीतील राम मंदिर चौकातील वातावरणाने मराठा मोर्चामध्ये चांगलेच रंग भरले. pic.twitter.com/fpLx5Pi9qH
— Lokmat (@lokmat) September 17, 2023
मोर्चाच्या बंदोबस्तासाठी सकाळी लवकर तैनात झालेल्या पोलीस बांधवांचीही संयोजकांनी काळजी घेतली. पाणी, बिस्किटे दिली. मोर्चाच्या निमित्ताने सात वर्षांनी मराठ्यांनी पुन्हा एकदा ताकद दाखवली. एक मराठा, लाख मराठाची गर्जना करत गर्दी केली. साडेअकरा वाजले तरी विश्रामबाग चौकात ग्रामीण भागातून मोर्चेकऱ्यांचे लोंढे येत होते, त्यामुळे मोर्चा सुरु होण्यास वेळ होत होता. मोर्चासाठी रुग्णवहीका, रिक्षा आदींनी मोफत सेवा सज्ज ठेवली होती.