‘एनआरसी’विरोधात पुरोगामींचा एल्गार- सांगलीतील बैठकीत व्यापक लढ्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 01:19 AM2019-12-24T01:19:28+5:302019-12-24T01:19:48+5:30
आंदोलनाच्या नियोजनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तरुणांमध्ये जागृतीसाठी शिबिरेही घेण्याचे ठरले. यातील जिल्हास्तरीय शिबिर सांगलीत ११ जानेवारीस घेण्यात येणार आहे. सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लढा तीव्र करण्यात येणार आहे.
सांगली : नागरिकत्व नोंदणी आणि संशोधन कायद्याविरोधात पुरोगामी कार्यकर्ते एकवटले आहेत. सोमवारी सांगलीत झालेल्या व्यापक बैठकीत जिल्हाभरातून उठावाचा निर्णय झाला. राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्याचे ठरले.
बैठकीला ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. नामदेव करगणे, धनाजी गुरव, मन्नान शेख, दिग्विजय पाटील, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, अॅड. आर. बी. कोकाटे, प्रभाकर सनमडीकर, डॉ. दीपा श्रावस्ती आदी उपस्थित होते.
धनाजी गुरव म्हणाले, ‘सध्या देशभरात मी म्हणेल तो कायदा, अशी ठोकशाही सुरू आहे. नागरिकत्वाच्या कायद्याने भारतीय संविधानालाच आव्हान दिले आहे, तो हाणून पाडला पाहिजे. कायद्याच्या जोरावर जातीजातीत व धर्मा-धर्मात फूट पाडली जात आहे. निधर्मी देशाची वाटचाल हिंदुत्वाकडे सुरू आहे. त्याला वेळीच रोखण्याची जबाबदारी सुजाण विचारवंतांसह सजग नागरिकांचीही आहे. प्रसंगी कायद्याचाही आधार घेऊ. विकास मगदूम म्हणाले, सर्व पुरोगामी पक्षांना सोबतीला घेऊन उठाव केल्याशिवाय हा अन्याय थांबणार नाही.
प्रा. गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदूम, चंद्रकांत लोंढे, डॉ. संजय पाटील, नामदेव करगणे आदींनीही भूमिका मांडल्या. बैठकीतील निर्णय असे : या कायद्याला सविनय कायदेभंग पद्धतीने विरोध करायचा. जिल्हास्तरीय भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, त्याचा संभाव्य दिवस २५ जानेवारी असेल.
आंदोलनाच्या नियोजनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तरुणांमध्ये जागृतीसाठी शिबिरेही घेण्याचे ठरले. यातील जिल्हास्तरीय शिबिर सांगलीत ११ जानेवारीस घेण्यात येणार आहे. सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लढा तीव्र करण्यात येणार आहे. बैठकीला शिवाजी त्रिमुखे, रोहित शिंदे, राजू कांबळे, हनीफ ताशिलदार, नईम शेख उपस्थित होते.
- ...तर शिवसेनेलाही सोबत घेणार
धनाजी गुरव म्हणाले, जो कायदा संविधानाविरोधात आहे, तो आम्हालाही मान्य नाही. त्याच्या रक्षणासाठी सविनय कायदेभंग मार्गांनी विरोध करू. प्रत्येक गावातील पन्नास कार्यकर्र्ते ही चळवळ आपापल्या गावात पुढे नेतील. या लढ्यात शिवसेना सोबतीला आली तर, त्यांचीही मदत घेऊ.
सांगलीत पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत धनाजी गुरव यांनी ‘नागरिकत्व संशोधन व नोंदणी कायद्या’विषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, धनाजी गुरव, विकास मगदूम, नामदेव करगणे आदी उपस्थित होते.