संविधान सन्मानासाठी एल्गार
By Admin | Published: January 18, 2017 12:18 AM2017-01-18T00:18:51+5:302017-01-18T00:18:51+5:30
सांगलीत मोर्चा : अॅट्रॉसिटीसह विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सांगली : अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, माळवाडी घटनेतील संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी विविध पक्ष, संघटनांच्यावतीने सांगलीत ‘संविधान सन्मान मूक मोर्चा’ काढण्यात आला.
सांगलीतील पुष्पराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. त्रिकोणी बाग, सिव्हिल हॉस्पिटल रोड, आंबेडकर चौक, झुलेलाल चौक, एसटी स्टॅँड, शिवाजी मंडई, राजवाडा चौक मार्गे मोर्चा स्टेशन चौकात आला. विविध पक्ष, संघटनांचे हजारो कार्यकर्ते निळे, पिवळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.
सांगलीच्या स्टेशन चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आंदोलनकर्त्या योगीता श्रीवास्तव म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेत कोणीही बदल करू शकत नाही. अॅट्रॉसिटी अॅक्ट रद्द करून महिलांवरील अत्याचार थांबतील, असा विचार करणे चुकीचे आहे. कोणत्याही जाती-धर्माच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. अशा घटनेमुळे जातीअंतर्गत तेढ निर्माण होऊ नये. समाजातील समताभाव अबाधित राहिला पाहिजे. मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. अन्य समाजघटकांच्याही आरक्षणाच्या मागण्या मान्य करून कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावू नये. समाजातील एकोपा टिकावा, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. प्रतीक्षा कांबळे या युवतीने निवेदन वाचन केले. त्यानंतर युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये योगीता श्रीवास्तव, सुश्मिता कांबळे, प्रतीक्षा कांबळे, मनीषा कांबळे, आम्रपाली कांबळे, प्रजासत्ता संघमित्र, सोनाली मोहिते, शुभांगी मोहिते, बबली घार्गे या युवती सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनात प्रा. सुकुमार कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, नानासाहेब वाघमारे, किरण कांबळे, बाबासाहेब कांबळे, विठ्ठल सोनवणे, बापू कांबळे, अशोक गायकवाड, संजय कांबळे, लालासाहेब वाघमारे, अशिष गाडे नितीन गोंधळे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
फेटे, झेंडे मफलर
निळे झेंडे, निळे फेटे आणि निळे मफलर घालून आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. युवतींनीही निळे फेटे परिधान केले होते.
पोलिस बंदोबस्त
मोर्चात हजारो लोक सहभागी झाल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले होते. स्टेशन चौकातील वाहतुकीतही दुपारी बदल करण्यात आला. सायंकाळी चारनंतर स्टेशन रोडवरील वाहतूक पूर्ववत झाली.