शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता यादीतील त्रुटी दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:38+5:302021-04-28T04:28:38+5:30
सांगली : जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांमधून विस्ताराधिकारी व वरिष्ठ मुख्याध्यापक या पदांच्या पदोन्नतीसाठी शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी बनविलेली आहे. ती ...
सांगली : जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांमधून विस्ताराधिकारी व वरिष्ठ मुख्याध्यापक या पदांच्या पदोन्नतीसाठी शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी बनविलेली आहे. ती यादी सदोष असून त्रुटी पूर्तता करूनही यादीत दुरुस्ती झालेली नाही. सदोष यादीमुळे पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडू शकते; त्यामुळे त्रुटी दुरुस्ती करून पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याशी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन संवादही साधला. निवेदनात म्हटले आहे की, वरिष्ठ मुख्याध्यापकांची भरती करीत असताना मराठी माध्यमाच्या सेवाज्येष्ठता यादीप्रमाणेच उर्दू व कन्नड माध्यमांच्या शिक्षकांचीही वेगळी यादी प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. विस्ताराधिकारी हे भाषिक पद नसल्यामुळे विस्ताराधिकारी पदासाठी मराठी, कन्नड व उर्दू माध्यमांची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. आधीच प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया दोन वर्षापासून प्रलंबित आहे. त्यात सदोष यादी तयार केल्यास पुन्हा विलंब होऊ शकतो; त्यामुळे सेवाज्येष्ठता यादीत दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, शिवाजी चव्हाण, संतोष जगताप, नितीन चव्हाण, शब्बीर तांबोळी, अजितराव पाटील, मोहन माने, प्रमोद कोडग, अशोक घागरे, आसिफ मुजावर, प्रदीप पवार यांच्या सह्या आहेत.