विटा नगरपरिषदेसाठी इच्छुकांचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:17+5:302021-03-20T04:24:17+5:30
विटा : सांगली जिल्ह्याचे लक्ष असलेल्या विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी ...
विटा : सांगली जिल्ह्याचे लक्ष असलेल्या विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील समर्थक गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच आता विटा पालिकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत आहेत.
विटा नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून माजी आ. सदाशिवराव पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. गेल्यावेळी शिवसेना व कॉँग्रेसमध्ये दुरंगी झाली होती. त्यावेळी मनमंदिरचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांनीही अॅड. पाटील यांना ताकद दिली. अॅड. पाटील व अशोकराव गायकवाड यांच्या संयुक्त गटाला नगराध्यक्ष पद व २४ पैकी २२ जागा मिळाल्या होत्या.
सध्या राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महाआघाडीची सत्ता आहे. परंतु, विटा पालिकेच्या निवडणुकीत महाआघाडीचा फॉर्म्युला चालणार नाही. कारण आ. बाबर हे शहरातील आपला गट शाबूत ठेवण्यासाठी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरतील.
विटा नगरपरिषदेची यावर्षीची निवडणूक आजी-माजी आमदारांसह मनमंदिरचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील माजी उपाध्यक्ष सुहास बाबर या दोन युवा नेत्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात भाजपचा गट सक्रिय झाला आहे.
गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आ. बाबर यांना ताकद देणारा कॉँग्रेसचा गट विटा पालिकेच्या निवडणुकीतही आ. बाबर यांच्या पाठीशी ठाम राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला कॉँग्रेसची ताकद मिळण्याचेही संकेत आहेत.
चौकट
दोन आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष
भाजपचे आ. पडळकर यांनी विटा नगरपरिषदेची निवडणूक स्वतंत्र पॅनल देऊन ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गत विधानसभा निवडणुकीत युतीमुळे शिवसेनेचे आ. बाबर यांना मदत केल्याने आ. पडळकर आणि आ. बाबर हे दोन्ही आमदार पालिकेसाठी एकत्रित येतील का? असा सवालही यावेळी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या दोन्ही विद्यमान आमदारांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
फोटो - १९०३२०२१-विटा-आ. अनिल बाबर. यांचा फोटो वापरणे.
फोटो - १९०३२०२१-विटा-माजी आ. सदाशिवराव पाटील. यांचा फोटो वापरणे.
फोटो - १९०३२०२१-विटा-आ. गोपीचंद पडळकर. यांचा फोटो वापरणे.
फोटो - १९०३२०२१-विटा- अशोकराव गायकवाड. यांचा फोटो वापरणे.
फोटो - १९०३२०२१-विटा-वैभव पाटील. यांचा फोटो वापरणे.
फोटो - १९०३२०२१-विटा-सुहास बाबर. यांचा फोटो वापरणे.