शिराळ्यात जोर कायम

By admin | Published: July 12, 2016 11:43 PM2016-07-12T23:43:57+5:302016-07-13T00:44:27+5:30

मोरणा नदीलाही पूर : वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली

The emphasis in Shirala continues | शिराळ्यात जोर कायम

शिराळ्यात जोर कायम

Next

शिराळा : शिराळा तालुक्यात सतत अतिवृष्टी सुरू असून, वारणा व मोरणा नदीस पूर आला आहे. वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.
चांदोली धरण व अभयारण्य परिसरात पावसाची संततधार कायम असून चांदोली धरण ५३.२० टक्के भरले आहे. धरणात १८.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दररोज सरासरी २ टीएमसीने धरणाचे पाणी वाढत आहे. धरण पातळी ६०८ मीटर झाली आहे.
तालुक्यात सर्व मंडल क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. शिराळ्यात ९३ मि.मी. (६१० मि.मी.), वारणावती - १३२ (१०६९), सागाव - १३८ (६६०), मांगले - १२९ (७२५), चरण - ११९ (७६२), कोकरूड - ९७ (७६६), शिरशी - ५३ (३५४) असा मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील मोरणा, करमजाई, अंत्री, टाकवे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. शिवणी धरण ९४ टक्के भरले आहे. तालुक्यातील पाझर तलाव भरले आहेत.
वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे चरण येथील ऊसशेती खचून मोठे नुकसान झाले आहे. वाकुर्डे, कोकरूड येथे घरांच्या भिंती पडल्या आहेत. वारणा नदीवरील आरळा-शित्तूर, मांगले-काखे, मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे हे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोडोली, पन्हाळा, कोल्हापूर या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
काळुंद्रे येथील हुबाल वस्तीत पाणी शिरले असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. आरळा- येसलेवाडी येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तालुक्यातील २६ पुलांखालील गावांना तहसीलदार यांनी सतर्कतेचा इशारा दिला असून तहसील कार्यालयात पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तलाठी, ग्रामसेवक यांना गाव न सोडल्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिळाशी येथे झाडे उन्मळून पडली आहेत. नैसर्गिक आपत्तीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकात पाणी साठल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी साठल्यामुळे खड्डे पडले असून, वाहन चालविणे कठीण झाले आहे. मोरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
सलग ७२ तास झालेल्या अतिवृष्टीमुळे ४२२ मिलिमीटर पावसासह एकूण १०६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ५१८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८.३० टीएमसी झाला आहे, तर धरण पातळी ६०८.00 मीटर झाली आहे. त्याची टक्केवारी ५३.२० अशी आहे. (वार्ताहर)


जनावरांचे स्थलांतर
कोकरूड : १ जुलैपासून सुरू असणारा संततधार पाऊस मंगळवारीही कायम होता. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे कोकरूड गावच्या शिवारात पाणी शिरल्यामुळे नदीकाठी वस्ती करून असलेल्या जनावरांना गावात हलविण्यात आले आहे. शिराळ्याच्या पश्चिम भागातील कोकरूड, बिळाशी, मांगरूळ, चरण, आरळा येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे गावात आणली आहेत. या परिसरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. कोकरूड, बिळाशी, मांगरूळ येथील स्मशानशेडला पाणी लागले आहे. मंगळवारी कोकरूड परिसरात ९७ मि. मी. पाऊस पडला. या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: The emphasis in Shirala continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.