द्राक्ष लागवडीला जोर
By admin | Published: June 7, 2016 11:11 PM2016-06-07T23:11:33+5:302016-06-08T00:11:36+5:30
सलगरेसह मिरज पूर्व भाग : दुष्काळी पट्ट्यास द्राक्षबागांमुळे नवी ओळख
दादा खोत -- सलगरे --मिरज पूर्व भागामधील सलगरे, चाबुकस्वारवाडी, जानराववाडी, बेळंकी परिसरामध्ये यावर्षी १५० एकर क्षेत्रावर द्राक्षबाग लागवड करण्यात आली आहे. मिरज पूर्व भाग हा द्राक्षपट्टा म्हणून विकसित होत आहे. फेबु्रवारी ते जून हा द्राक्ष लागवडीसाठी अनुकूल काळ मानला जातो. बहुतांश शेतकरी मार्केटिंगसाठी अनुकूल असणाऱ्या जातींची निवड करीत आहेत. त्यामध्ये सुपर सोनाक्का, माणिक चमन, आर. के. डायमंड या जातींना प्राधान्य देत आहेत.दर्जेदार उत्पादन आणि झाडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी पारंपरिक लागवडीला फाटा देऊन ३-९ व ४-९ अशा पध्दतीने झाडांची लागवड करून क्लोज प्लांटेशन पध्दतीचा वापर शेतकरी करू लागले आहेत. कमी क्षेत्रामध्ये झाडांची संख्या ठेवून दर्जेदार निर्यातीची द्राक्षनिर्मिती करण्यावर शेतकऱ्यांनी जोर दिला आहे. पारंपरिक द्राक्ष लागवडीला फाटा देऊन शेतकरी नवीन तंत्राचा वापर करू लागल्याने मिरज पूर्व भाग तासगावपाठोपाठ द्राक्षशेतीसाठी प्रसिध्दीच्या वाटेवर आहे. म्हैसाळ सिंचन योजनेमुळे पाण्याची शाश्वती निर्माण झाल्याने द्राक्षशेतीची लागवड वाढत असून बेदाणा निर्मितीबरोबरच मार्केटिंगसाठी अनुकूल असणाऱ्या जातीची निवड शेतकरी करीत आहेत.
द्राक्षशेतीसाठी लागणारे कुशल मजुरांचे गट भागामध्ये निर्माण झाले आहेत. शिवाय कर्नाटक सीमाभागातूनही असे मजुरांचे गट तयार झाल्याने कुशल मजूर सहजपणे उपलब्ध होत असल्याने, शेतकऱ्यांचा द्राक्षशेतीकडे ओढा वाढला आहे. द्राक्षशेतीचे क्षेत्र वाढत चालले असले तरी, अशात पाणीपुरवठा, बदलते हवामान, वाढत चाललेले मजुरीचे दर, मार्केटिंगमधील अनिश्चितता, बेदाणा विक्रीमध्ये वाढत चाललेला व्यापाऱ्यांचा प्रभाव यावरच भविष्य अवलंबून असणार आहे. शेतकऱ्यांनी यात सकारात्मक विचार करून द्राक्ष लागवडीवर भर दिला आहे.+++
सोसायट्यांचे साहाय्य
द्राक्ष लागवडीतून आर्थिक उत्पन्न चांगले मिळते, शिवाय द्राक्षशेतीच्या लागवडीसाठी विकास सोसायट्यांकडून पुरविले जाणारे भांडवल, कुशल मजुरांची उपलब्धता, विविध कंपन्यांकडून मिळणारे मार्गदर्शन यामुळे शेतकरी द्राक्षशेतीकडे वळू लागला आहे.