सेवानिवृत्तांना विश्रांती देऊन पदवीधर बेरोजगार तरुणांना काम द्या; डीएड, बीएड, तरुणांना शिक्षक म्हणून नियुक्तीची मागणी
By अशोक डोंबाळे | Published: August 25, 2023 02:25 PM2023-08-25T14:25:40+5:302023-08-25T14:33:11+5:30
शेकापच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने :
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्राथमिक शाळांमधील सेवानिवृत्तांच्या नियुक्त्या रद्द करुन डीएड, बीएड, शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली पदवीधर तरुणांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा तरुणांनी आरोपही केला.
शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. अजित सूर्यवंशी, तेजस्वीनी सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, सचिन करगणे, शिवाजी त्रिमुखे, वैभवराज शिरतोडे, किरण कांबळे, सचिन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. भारतीय शेतकरी कामगार पक्ष संलग्न डीएड, बीएड, बेरोजगार कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शिक्षकांची नोकरभरती झाली नसल्यामुळे दहा हजाराहून अधिक डीएड, बीएड, तरुण नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अशा हुशार अभ्यासू तरुण आणि कार्यक्षम असलेल्या बेरोजगार शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत तातडीने सामावून घेण्याची गरज आहे. याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन सेवानिवृत्त ६० ते ६५ वयोगटातील शिक्षकांना पुन्हा कामाला जुंपले आहे. वृद्धत्वाकडे झुकलेल्या शिवाय दरमहा तीस ते चाळीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या निवृत्त शिक्षकांना पुन्हा जिल्हा परिषद शाळांतून सामावून घेणं म्हणजे सरकारी शाळा उद्ध्वस्त करण्याचा डाव शासनाचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने सेवानिवृत्त शिक्षकांना दिलेले नियुक्ती आदेश रद्द करण्याची गरज आहे. त्याठिकाणी डीएड,बीएड, झालेल्या बेरोजगार तरुणांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याची गरज आहे.
शासनाने निर्णय रद्द न केल्यास तीव्र लढा : दिगंबर कांबळे
सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त शासनाने रद्द केल्या नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला आहे.